नायगांव बा./बरबडा/ कुंटूर| गत काही दिवसात दोन वेळा झालेल्या अतिवृष्टीत नायगांव तालुक्यात शेतीपिकासह मोठी हानी झाली.सत्ताधाऱ्यांकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने थेट या भागात भेटी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाच्यावतिने पिडीतांच्या समस्या जाणून घेण्यात येत असून बरबडा,कुंटूर परिसरातील बहुतांश गावात पदाधिकाऱ्यांनी हितगुज केले सोबतच,प्रसंगी आंदोलनात्मक भूमिका घेत शासनाकडून नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करु असे आश्वासन दिले.

अधिक माहिती अशी की,गत पंधरा दिवसांत नायगांव तालुक्यात तब्बल दोन वेळा अनेक तास झालेल्या संततधार पावसात मोठे नुकसान झाले आहे.पालकमंत्री अतुल सावे यांनी आपल्या दौर्यात थेट नुकसानग्रस्त भागाची पहाणी टाळून केवळ धावत्या भेटी दिल्या तर,स्थानिक आमदार विदेश दौर्यातच मग्न असल्याने जनतेतून रोष व्यक्त करण्यात येत आहे.प्रशासनाकडूनही सत्ताधाऱ्यांच्या सूचनेनुसारच कामे होत असल्याची ओरड जनतेत होत आहे.त्यामुळेच अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा देत थेट या भागात पहाणी करित जनसंवाद साधून माहिती घेण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर,राष्ट्रवादी किसान सभेचे मा.प्रदेश प्रतिनिधी लक्ष्मणराव मा.भवरे, तालुका सरचिटणीस किरण वाघमारे, तालुका उपाध्यक्ष बालाजी कदम कुंटूरकर,नायगांव शहराध्यक्ष संजय पाटील चव्हाण,नरसी शहराध्यक्ष दिनेश सुर्यवंशी,सय्यद जब्बार आदी पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

त्याच अनुषंगाने आज दि.३१ ऑगस्ट रोजी कहाळा (बु.) व कहाळा (खु.) येथे पाणी शिरलेल्या घरात, अंगणवाडी केंद्र आदी ठिकाणी भेटून माजी सरपंच विजय कारताळे,साहेबराव हेडंगे,प्रभाकर मेघळ, आनंदा हेडंगे, तोलबा मेघळ,दत्तराम चिकलवाड,तुकाराम नुकुलवाड, गजानन पुरजवार,लक्ष्मण कारताळे, बाबु शेख, सलमा शेख,माधव मिसाळे यांच्याकडून माहिती घेण्यात आली.तसेच, पाटोदा या ठिकाणी नुकसानग्रस्त शेतात जाऊन शेतीपिके,औजारे आदी नुकसानीची माहिती मोहन शंकर तिजारे, मनोज गोविंदराव हंबर्डे,पंडित आनंदराव हंबर्डे, विलास बालाजी तिजारे, राम दीपकराव हंबर्डे, विश्वंभर शेंडगे, ज्ञानेश्वर शिंदे पांडुरंग पंचवारे यांच्याकडून घेण्यात आली.

त्याचबरोबर,शेळगांव -दुगांव रस्त्यावरील सुजलेगांवनजीकचा खचलेला व कोकलेगांव रस्त्यावरील अर्धवट पुलाचीही पाहणी करण्यात आली.या अतिवृष्टीत नायगांव तालुक्यात सर्वत्रच मोठे नुकसान झालेले असल्याने सरसकट हेक्टरी दोन लाख व नदी-नाल्यालगतच्या शेतीसाठी विशेष पॅकेज, बळेगांव बंधारा बॅकवाॅटर ग्रस्तांच्या जमीनी ताब्यात घेऊन त्यांना मावेजा, मयत वा जखमी पशूपालकांना, घरे पडलेल्यांना, मयत झालेल्यांनाही तातडीची मदत आदी मागण्या मार्गी लावण्यास प्रसंगी आंदोलनात्मक भूमिका घेऊन शासनदरबारी प्रयत्न करु असे अभिवचन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर व सहकांऱ्यानी यावेळी दिले. दरम्यान, अतिवृष्टीग्रस्त भागातील पिडीतांसह जनतेने आपल्या भागातील नुकसानीची माहिती फोटो,व्हिडीओ आदी पुरावे तातडीने आमच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना पाठवावेत आम्ही भरपाईसाठी शासनस्तरावर प्रयत्न करु असे आवाहन राष्ट्रवादीकडून करण्यात आले आहे.
खा.शरदचंद्र पवार यांच्याकडून दखल !
महत्वाचे म्हणजे,राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषीमंत्री खा.शरदचंद्र पवार यांनी नांदेडचे खा.रवींद्र चव्हाण यांच्याकडून भ्रमनध्वनीवरुन नायगांवसह नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीचा आढावा नुकताच घेतला आहे.त्यांनी याबाबत घेतलेली दखलच आम्हाला न्याय मिळवून देईल अशी अपेक्षा अतिवृष्टीग्रस्तातून व्यक्त होत आहे.
