नांदेड ते आयोध्या विशेष रेल्वे सोडण्यात यावी – डीआरयुसीसी मेंबर धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर
नांदेड| रामजन्मभूमी येथे होणाऱ्या भव्य राम मंदिराच्या दर्शनासाठी नांदेड परिसरातून हजारो भाविक जाणार असल्यामुळे नांदेड ते आयोध्या विशेष रेल्वे सोडण्यात यावी या व इतर मागण्यांचे निवेदन भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अरविंद भारतिया व डीआरयुसीसी मेंबर धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी डीआरएम निधी सरकार यांना दिल्यानंतर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला.
शेकडो वर्षापासून आयोध्या मध्ये राममंदिर व्हावे ही लाखो हिंदू धर्मियांची मनीषा होती. २२ जानेवारीला भारताचे सर्वात यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या हस्ते भव्य मंदिरात श्रीराम लल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यानंतर भव्य मंदिराचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने हिंदू भाविक जाणार आहेत. त्यासाठी नांदेड ते आयोध्या विशेष साप्ताहिक रेल्वे एक वर्ष चालवण्यात यावी. तसेच वैष्णोदेवीच्या भक्तांसाठी नांदेड ते जम्मू तावी हमसफर एक्सप्रेस ही कटऱ्यापर्यंत सोडण्यात यावी.
सध्या सुरू असलेली नांदेड ते पुणे स्पेशल ट्रेन कायमस्वरूपी करण्यात यावी. याशिवाय नांदेड रेल्वे स्थानकावर असलेल्या एसी वेटींग रूममधील स्वच्छता गृहात ज्येष्ठ नागरिकांसाठी कमोड बसवण्यात यावे या मागण्यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली.निधी सरकार यांनी कमोड बसविण्याची प्रक्रिया त्वरित सुरू करण्याचे आदेश दिले. नांदेड ते आयोध्या विशेष रेल्वे, जम्मू तावी हमसफर एक्सप्रेस कटरा पर्यंत सोडणे आणि नांदेड ते पुणे सध्या सुरू असलेली विशेष रेल्वे कायमस्वरूपी चालवण्याबाबत रेल्वे बोर्डाकडे पाठपुरावा करण्यात येईल असा सकारात्मक प्रतिसाद दिला.
नांदेड रेल्वे डिव्हिजन ला आतापर्यंत आलेल्या सर्व डीआरएम मध्ये अतिशय उत्कृष्ट कार्य करत असल्याबद्दल निधी सरकार यांचा भारतीया व ॲड.ठाकूर यांनी सत्कार केला. रेल्वे संबंधी विविध मागण्याचा रेल्वेमंत्री तसेच खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याकडे पाठपुरावा करण्यासाठी लवकरच रेल्वे व प्रवासी महासंघाच्या वतीने बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष अरविंद भारतीय यांनी दिली.