राष्ट्रीय पोषण कार्यक्रमात नांदेड जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
नांदेड| देश कुपोषणमुक्त करण्याच्या निर्धाराने केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्या वतीने राबविण्यात आलेल्या राष्ट्रीय पोषण कार्यक्रमात नांदेड जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या कार्यक्रमात नांदेड जिल्ह्याने सर्वाधिक नोंदी करून राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे. आता जिल्हा कुपोषणमुक्तीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
आज नांदेड जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने राष्ट्रीय पोषण महा अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणारे अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता, त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, पंचायत विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, महिला व बाल विकास विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम- कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, प्राथमिक शिक्षणाधिकारी सविता बिरगे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, जिल्हा कृषी अधिकारी व्ही.आर. बेतीवार आदींची उपस्थिती होती.
पुढे ते म्हणाले, पोषण हा महत्त्वाचा घटक असून, पोषणामुळे आरोग्य चांगले राहते. शिक्षण घेता येते व चांगले शिक्षण मिळाले तर चांगली उपजिविकाही मिळू शकते. त्यासाठी सर्व विभागाने पुढाकार घेवून येत्या 8 मार्च पर्यंत जिल्हा कुपोषणमुक्त करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. प्रारंभी माँ जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रीय पोषण अभियानात नांदेड जिल्हा राज्यात प्रथम तर जिल्ह्यात अर्धापुर तालुका प्रथम आल्याबद्दल या अभियानात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अधिकारी-कर्मचारी, अंगणवाडी पर्यवेक्षीका, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
राष्ट्रीय पोषण महा अभियानात जिल्ह्यात मोठया प्रमाणात पोषणाची लोकचळवळ सुरू केलेली होती. जनजागृतीच्या माध्यमातून विविध उपक्रम ग्रामीण भागात राबविले होते. राबविलेल्या उपक्रमाच्या नोंदी केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर करण्यात आल्या. जिल्हयाने 78 लाख 46 हजार 710 नोंदी केले असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी सांगितले. महिला व बाल विकास विभाग, शिक्षण, आरोग्य, जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, ग्राम पंचायत विभागांसह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी या अभियानात सहभागी झाले होते. त्यामुळेच जिल्हा राज्यात प्रथम येऊ शकला तसेच योग्य पद्धतीने नियोजन केल्यास अभियान यशस्वी करता होऊ शकते, असेही मुख्य कार्यकारी अधिकारी मिलन करनवाल म्हणाल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला व बाल विकास विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-कदम यांनी केले. सूत्रसंचालन उमेश मुदखेडे तर उपस्थितांचे आभार एल. एम. राजुरे यांनी मांनले. या कार्यक्रमाला गट विकास अधिकारी डी.एस. कदम, गटशिक्षणाधिकारी लोकडाजी गोडबोले, बाल विकास प्रकल्प अधिकारी मयुरी पुणे, तालुका आरोग्य अधिकारी देसाई, अंगणवाडी पर्यवेक्षिका गंगा केंद्रे, अंगणवाडी सेविका, मदतनीस आदींची उपस्थिती होती.