आर्टिकल

माता रमाई आंबेडकर : १२५ व्या जयंती महोत्सवाचे प्रयोजन

माता रमाईच्या जयंतीचं हे एकशे पंचविसावं वर्ष. परंतु आंबेडकरी चळवळीतील नेते आणि कार्यकर्ते यांनी मोठ्या प्रमाणावर या वर्षाकडे दुर्लक्ष केले. बाबासाहेबांची १२५ वी जयंती जशी धुमधडाक्यात साजरी झाली तशी रमाईच्या १२५ व्या जयंतीचं वर्ष साजरं व्हायला हवं होतं.‌ पण ते तसं झालं नाही. रमाईच्या आदर्शवादाचा, जगण्याचा तसेच रमाई या आपल्या सगळ्यांच्या अस्तित्वाचा महोत्सव साजरा व्हायला हवा होता. अख्खं वर्ष संपत आलं तरी आपल्यातल्या कार्यकर्त्याला जाग आलेली दिसत नाही.‌‍ संबंध महाराष्ट्रातल्या अनेक स्वयंघोषित आंबेडकरी नेतृत्वांनी आणि त्यांच्या चेल्या चपाट्यांनी ही मोठी घोडचूक केली आहे. ती केली नसती तर त्यांचं नेतृत्व सिद्ध झालं असतं. कारण पुढील ७६ व्या वर्षात कितीही आदळआपट केली तरी ही चूक भरून निघणारी नाही. शासकीय पातळीवर काय झाले ते माहीत नाही कारण काही स्तुतिपाठकांनी कोल्हेकुई केल्याचे ऐकिवात आहे. महामानवांना २५ काय नि ७५ काय दररोजच जयंती साजरी करता येते, अशी सारवासारव केली तर काही अर्थ नसेल. मानवी आयुष्यात अनेक वर्षे असतात आणि त्याचे महत्त्व किंवा वैशिष्ट्य वेगळे असते. ७५ व्या रमाई जयंती वर्षात आंबेडकरी समाज आणि चळवळीच्या अनुषंगाने महोत्सवाचा विचार अगदी कोणत्याही परिस्थितीत पुढे आलेला दिसत नाही. परंतु हा विचार बुद्धीष्ट रिसर्च फाऊंडेशन या नांदेडातील संस्थेने केला आणि रमाईच्या जयंतीचं शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष संपण्यापूर्वी हा महोत्सव घडवून आणण्यासाठी दिवस रात्र एक केला, त्याबद्दल आंबेडकरी समाजानेच नव्हे तर तमाम भारतीयांनी बीआर फाऊंडेशनचे आभारच मानले पाहिजेत. कारण रमाई नसत्या तर बाबासाहेब हे बाबासाहेब नसते. बाबासाहेब नसते तर तुम्ही आम्ही नसतो. हे त्रिकालाबाधित सत्य आहे. रमाई बाबासाहेबांची केवळ एक पत्नी, सहचारिणी नव्हती तर ती कोट्यवधी दीनदुबळ्यांची आई होती. रमाई बाबासाहेबांनी स्वतःची एकूण चार अपत्ये गमावली पण त्यांनी या देशातील लाखो सूर्यपुत्रांना जन्माला घातले. बाबासाहेबांच्या बाबासाहेबपणात रमाईचा असीम त्याग समाविष्ट झालेला आहे. या त्यागाची परतफेड होऊ शकत नाही. परंतु एक छोटासा प्रयत्न असणारा सावित्री रमाई  महोत्सव हा एक ऐतिहासिक सोहळा असणार आहे.  एक दिवस रमाईसाठी महोत्सव आयोजित करून फार मोठे‌ कार्य केले असे अजिबात नाही तर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केलेली ही धडपडच आहे, असे म्हणता येईल.

नांदेडातल्या बी. आर. फाऊंडेशनने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आणि रमाई जयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरातील कै.‌ डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात सावित्री रमाई महोत्सव आयोजित केला आहे. या निमित्ताने सावित्रीच्या लेकींचा सन्मान होणार आहे. यात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उच्चशिक्षित किंवा उच्चपदस्थ महिलांचा सन्मान होणार आहे. मात्र, अजूनही काही आमच्या माया बहिणी रमाईगत जगण्याला जळण्याची झालर लावून जीवन जगत आहेत. त्यांचाही सन्मान होणे अपेक्षित आहे. सावित्रीच्या लेकी या रमाईच्याही लेकीच आहेत. रमाईच्या त्यागावर आणि सावित्रीमाईच्या क्रांती चळवळीवर आज अनेक महिला विविध क्षेत्रात भराऱ्या मारत आहेत. पिढ्यानपिढ्यांच्या गुलामगिरीला तोडून स्वातंत्र्याची फळे चाखत आहेत. ही फळे या मुक्तीच्या झाडाला उगीचच लगडलेली नाहीत. हे झाड काल्पनिक नाही. या झाडाला एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकाने रक्ताचे पाणी करून सिंचिले आहे. याला अविरत चालणाऱ्या संघर्षाचे सेंद्रिय खत घातले आहे. हे झाड केवळ स्त्रीमुक्तीच्या भाषणांवर वाढलेले नाही. जिवाची पर्वा न करता वेळोवेळी पुकारलेल्या लढ्यांच्या विश्वविजयी फुलमोहोरांचे ते संगोपन आहे. हरेक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने आपले अस्तित्व सिद्ध करणाऱ्या स्त्रियांनी सावित्री रमाई यांना जाणून घेतले पाहिजे. आज मिळणारे सुखवैभव, सुखनैव आयुष्य ही त्यांचीच देण आहे. आजच्या या मायालेकींना केलेली जन्मोनजन्मींची ती बोळवणच आहे. म्हणून आजच्या कोणत्याही जाती धर्मातील स्त्रियांनी ‘सावित्री – रमाई’ला विसरता कामा नये.

आजच्या हिंदुस्थानी स्त्रिया मोठ्या प्रमाणावर धार्मिक व्रत वैकल्यात गुरफटलेल्या आहेत. त्या अजूनही धार्मिक बंधनाच्या गुलामगिरीत खितपत पडलेल्या आहेत. तसेच पुरुषी अत्याचाराखाली त्या दबलेल्या, सर्व प्रकारच्या शोषणाला बळी पडलेल्या आणि अंधश्रद्धांच्या आहारी गेलेल्या या स्त्रियांनी हेच आपलं आयुष्य आहे; तेच आपले नशीब आहे असे मानले; आजपर्यंत तसे त्या मानीत आल्या आहेत. या सर्व प्रकारच्या गुलामगिरीने त्यांचे स्वाभाविक सौंदर्य जाळून त्यांना कुरुप करून ठेवले आहे.  पण हे त्यांच्या  सहजासहजी लक्षात येत नाही, अशी असणारी परिस्थिती सर्वत्र दिसून येते. सण, उत्सव आणि व्रतवैकल्ये उपवास यांच्या आधीन राहून स्वतःचे शारीरिक सौंदर्य उजळविण्यात त्या स्वतःला धन्य मानतात. उच्चशिक्षित किंवा उच्चपदस्थ अधिकारी असल्या तरी आणि पती कसाही असला तरी वडाच्या झाडाला दोरा गुंडाळून तोच नवरा मागण्याचा प्रघात अजूनही सुरूच आहे. आपला पती श्रेष्ठ आहे आणि आपण त्याची मानसिक तथा शारीरिक दृष्टीने सेवाभावी दासीच आहोत, ही मानसिकता जाता जात नाही, हे त्या महिलांसह त्यांच्या जातसमुहाचीही शोकांतिका आहे. अशा महिलांनी एक तर सावित्री रमाईंना सोयीस्कररीत्या बाजूला केले किंवा केवळ फोटोला पुष्पमाला अर्पण करण्याइतकेच मर्यादित ठेवले. त्यामुळे इतरवेळी देवीदेवतांचे फार मोठे प्राबल्य त्यांच्या आयुष्यात असलेले दिसून येते. आपण धर्माच्या नावाखाली वेगवेगळ्या पद्धतीने गुलाम केले जात आहे याची साधी जाणीवही त्यांना नसते. शिक्षण हे वाघिणीचे दूध मानून प्राशन करणाऱ्या या महिलांनी खरं तर वाघिणीगत या व्यवस्थेविरोधात चवताळून उठले पाहिजे. पण तसे होताना दिसत नाही, धर्म हा श्रद्धेचा विषय मानला जातो. धर्म आणि पुरुषसत्ताक व्यवस्थेची गुलामी वंशपरंपरेने आजीकडून आईकडे, आईकडून बाईकडे, बाईकडून ताईकडे अशी आली असल्यामुळे आणि त्यांना त्यामुळेच आपल्या गुलामीची जाणीव नसल्यामुळे ती झिडकारून टाकण्याचा विषयच निर्माण होत नाही.

स्त्रीमुक्तीचा विचार बुद्ध काळापासून पुढे सतत प्रसवत राहिला आहे. भारतीय संविधानाने पुरुषांच्या बरोबरीचा हा समानतेचा नव्हे तर सर्वांगीण दृष्टीने समतेचा विचार केलेला आहे. बुद्धाच्या मानवी स्वातंत्र्याची विचारधारा संविधानाने ह्या भारतवर्षाला दिली आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक परिश्रमातून बुद्ध तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब भारतीय संविधानात पडलेले आपल्याला दिसते. हे संविधान स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचा हक्क आणि आपले स्वतंत्र मानवी जीवन जगण्याचा अधिकार प्रदान करते. परंतु ग्रामीण भागासह शहरातही विविध पातळ्यांवर पुरुषच कारभारी असल्याचे आपणास पदोपदी जाणवते. स्थानिक स्वराज्य संस्थेपासून देशाच्या सर्वोच्च संस्थेपर्यंत या स्त्रियांच्या पाठीमागे पुरुष भक्कमपणे उभे ठाकतात. स्रियांची दशा आणि दिशा ठरविण्याचा पारंपरिक वारसा पुरुषांकडेच आहे. ज्या स्त्रियांनी कौटुंबिक बंधने झुगारली; त्या महान झाल्या. पण कुटुंब भावनेला सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक स्त्रियांनी आपल्या उज्ज्वल भविष्याला तिलांजली दिली आहे. आपले करियर संपुष्टात आणले आहे. लग्नाआधी चित्रपटसृष्टीत नाव कमावणाऱ्या नट्यांचे लग्नानंतर काय होते, हे याचे उत्तम उदाहरण आहे. लहानपणी वडिलांच्या छत्रछायेखाली वाढावे, कुमारवयात भावाने संरक्षण करावे, लग्नानंतरचे तारुण्य नवऱ्याने सांभाळावे आणि म्हातारपणीच्या काठीचा आधार मुलगाच व्हावा ही धर्मांध सांस्कृतिक मानसिकता भारतीय महिलांची अजूनही गेलेली नाही. त्यांनी अशा स्वरूपाच्या जीवनाला खरे जीवन मानून आपलेसे केले आहे. या जीवनात तिला निर्णयप्रक्रियेत कोणतेही स्थान नाही, एवढेच नाही तर स्वतः संबंधी  निर्णय घेण्याचाही अधिकार  तिला नाही.

अडाणी अशिक्षित असणाऱ्या शेतमजूर व शेतकरी महिलांनी काबाडकष्ट केले तरी तिला मिळालेल्या पैशांवर घरातील पुरुषांचाच अधिकार राहिलेला आहे. तिची वेशभूषाच अशी मान्य करण्यात आली की, तिच्या कपड्यांना खिसाच नाही. या नव्या आधुनिक युगात तिनी पर्स वापरली तरी त्यात पैसा कुठून येणार? बदलत्या काळानुसार स्री जेव्हा कमावती झाली तेव्हा तिच्या पैशाच्या अधिकारावरची पुरुषांची पकड हळूहळू कमी होत गेली असली तरी ती कायमची संपुष्टात आलेली नाही. नोकरी व्यवसायात असलेल्या महिलांना पुरेसा पैसा मिळत असला तरी त्याचे विस्तारित अर्थकारण पुरुषांच्याच हाती असते. अपवादात्मक परिस्थितीत ज्या स्त्रियांनी पुरुष जिवंत असताना घरासह बाहेरचाही आर्थिक कारभार हाती घेतला आहे, त्याबरोबरच कौटुंबिक निर्णय घेण्याचा अधिकारही स्वतःकडे ठेवलेला आहे अशी परिस्थिती पुढारलेल्या समाजाला पडद्याआडून मान्य होत नाही. स्त्रियांच्या शिक्षणाला आणि नोकरी व्यवसायाच्या क्षेत्रात आपले भविष्य घडविण्याच्या प्रक्रियेला विरोध करणारी समाजमान्य पुरुषांची जमात आजही वेगवेगळ्या कारणांनी कार्यरत आहे. त्यांचे वर्चस्व कायमस्वरूपी झुगारून द्यायचे असेल तर सावित्री रमाई नावाचे शस्र सतत परजत राहावे लागेल. मी माता सावित्री आणि रमाईच्या कार्यकर्तृत्वामुळे घडले, माझे आयुष्य नि भविष्य उजळले असे छातीठोकपणे सांगणाऱ्या महिलांनी ‘सावित्री- रमाई’ जिवंत ठेवण्यासाठी काही अर्थनिर्णय घेणे गरजेचे आहे. ही सुरुवात खरे तर आपल्या घरापासूनच करायला हवी. पोकळ स्वरूपाची कृतज्ञता व्यक्त करण्याची केवळ वल्गना न करता त्यांनी आपली मजुरी, मिळकत, मानधन, पगार किंवा वेतन यातील काही हिस्सा खऱ्या अर्थाने ज्या माय माऊल्यांनी आपल्याला घडविलं, ज्यांनी आपलं मानवी जीवन कारणी लावलं, त्यांच्या चरणी अर्पण करायलाच हवे! इतके या निमित्ताने समजून घेतले आणि तसे वागण्याचा प्रयत्न केला तरी जगण्याचे प्रयोजन सफल होईल, ह्यात शंका नाही.

     – प्रज्ञाधर ढवळे, नांदेड. मो. ९८९०२४७९५३.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!