नळयोजनेसाठी 19 कोटींचा खर्च ; हिमायतनगरात भीषण पाणी टंचाई ; शेकडो महिलांचा नगरपंचायतीवर धडकला मोर्चा

हिमायतनगर, अनिल मादसवार। मागील सात वर्षापूर्वी हिमायतनगर शहराचा कायमस्वरूपी पाणी प्रश्न सोडविण्यासाठी 19 कोटींची नळयोजना मंजूर करण्यात आली. मात्र या कामात ठेकेदार अभियंता यांचा मनमानी कारभार, नेत्यांच्या टक्केवारीच धोरण व आजी माजी पदाधिकारी यांची लुडुबुडू यामुळे ही योजना सपशेल फेल होतांना दिसत आहे. आजघडीला कडाक्याच्या उन्हात शहरांतील नागरिकांना घडाभर पाणी देखील मिळत नसल्याने शेकडो महिलांनी आज दि 24 रोजी नगरपंचायत कार्यालयावर धडक मोर्चा काढला. प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळें महिला वर्गांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आहे. अशीच परिस्थिती राहिली तर हिमायतनगर शहरात पाण्यासाठी डोके फोडून घेण्याची वेळ येणार आहे.
हिमायतनगर शहरात 19 कोटींची नळयोजना पुर्णत्वास जाऊन देखील हंडाभर पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे. सध्या उन्हाचा कडाका वाढला असून, तहान भागविण्यासाठी अजूनही शहरातील नागरिकांना भटकंती करावी लागते आहे. हिमायतनगर नगरपंचायतवर सुरुवातीला काँग्रेसची सत्ता होती. तर नंतरचे अडीच वर्षे शिवसेनेची सत्ता होती, या दोघांच्या कार्यकाळात ही नळयोजना पूर्णत्वास गेली नाही, प्रशासक काळात नलयोजनेचे काम शेवटच्या टप्प्यात आले तरी अद्याप जनतेला थेंबभर देखील पाणी मिळाले नाही.
नगरपंचयतीला कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने नळयोजनेसह शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे शहरातील जनतेला अस्वच्छता, घाणीच साम्राज्य, पाणी टंचाई व रात्रीला अंधारात दिवस काढावे लागत आहे. असे असताना देखील प्रशासकीय यंत्रणा व नगरपंचयतीचा कारभार पाहणारे अधिकारी व कर्मचारी यांच्या दुर्लक्षित कारभारामुळे शहरातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. यात प्रमुख समस्या म्हणजे पाणी टंचाईची भीषणता वाढली असून, याचा उद्रेक आता दिसू लागला आहे.
पाणी टंचाईच्या समस्येने त्रस्त झालेल्या हिमायतनगर शहरातील वॉर्ड क्रमांक 11 मधील शेकडो महिलांनी प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा निषेध करत मोर्चा काढला आहे. अचानक नगरपंचयतीवर आलेल्या मोर्चामुळे नगरपंचयत कार्यालयात असलेल्या अधिकारी कर्मचारी यांची एकाच धावपळ झाली. आणि महिलांच्या मागणीचे निवेदन घेऊन यावर तोडगा काढला जाईल असे आश्वासन दिल्याने मोर्चेकरी शांत झाले. पाणीटंचाई तात्काळ दूर करा अन्यथा नगरपंचायत प्रशासनाच्या विरोधात दिनांक 27 नंतर नगरपंचयती समोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विलास डांगे, किशोर ढोणे, निर्मलाबाई हेंद्रे, माधव शिंदे, जनाबाई चव्हाण, किशोर माने, मंदाबाई हेंद्रे, सपना कोरडे, नंदाबाई काळे, बेबीबाई शिंदे, आशाताई ढोणे, धुरपतबाई हेंद्रे, सारिका रावते, वैशाली जाधव, गंगाबाई रामराव, यमुनाबाई वाघमारे, रेखा रामचंद्र, आशाताई ढोणे, आदिंसह शेकडो महिलांच्या वतीने देण्यात आला.
एकीकडे लोकसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरू असताना दुसरीकडे हिमायतनगर येथील महिलांना पाणी टंचाईमुळे नगरपंचयतीवर मोर्चे काढावे लागत आहेत. खोटे आश्वासन देऊन पाणी टंचाई दूर करू म्हणणाऱ्या लोकप्रतिनिधीचा महिला वर्गाने निषेध करत भव्य मोर्चा काढला. आणि पाणी नाही मिळाले तर यापुढे तीव्र आंदोलन छेडू असा इशारा दिला. ही बाब लक्षात घेता हिमायतनगर शहरातील पाणी टंचाईचा प्रश्न तात्काळ सोडवावा अन्यथा याचे परिणाम निवडणूक मतदानातून दिसून येतील असेही अनेक नागरिक महिलांनी पत्रकारांशी खाजगीत बोलताना सांगितले.
