महासंस्कृती महोत्सवात ‘आदि माया आदि शक्ती’नी केला कलेचा जागर
नांदेड| महासंस्कृती महोत्सवात काल महाराष्ट्राचा लोकोत्सवात विविध बहारदार कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर आज ‘आदि माया आदि शक्तीचा’ जागर या कार्यक्रमाची सुरुवात झाली. यात शास्त्रीय गायन, व्हायोलिन, बासरीवादन, भुलाबाई, धिरो धिरो पारंपारिक आदिवासी नृत्य, ताल संकिर्तन या कार्यक्रमात प्रथितयश कलाकार व स्थानिक कलाकारांच्या जागराने उपस्थित रसिकांची मने मंत्रमुग्ध केली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या मैदानावर हा सोहळा होत आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमांना नागरिक उर्त्स्फूत प्रतिसाद देत आहेत.
राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय व नांदेड जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महासंस्कृती महोत्सव 15 फेब्रुवारी पासून सुरु झाला आहे. 16 फेब्रुवारी रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती, नवा मोंढा येथे भव्य प्रमाणात सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. काल जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रमाच्या या मेजवानीचे थाटात उद्घाटन केले.
आज या कार्यक्रमात नांदेड प्रथितयश कलाकारांच्या सादरीकरणाने सुरुवात झाली. यामध्ये स्वप्नील आळंदीकर शास्त्रीय गायन सादर केले, गुंजन पंकज शिरभाते व पंकज शिरभाते यांच्या चमुने व्हायोलिनचे सादरीकरण केले, एैनोद्दिन वारसी यांनी व त्यांच्या चमुने बासरी वादन सादर केले. त्यांच्या बासरी वादनाने रसिक मंत्रमुग्ध झाले. इंद्रधनू सखी ग्रुप अनघा जोशी त्यांच्या चमुने भुलाबाई या आगळ्या वेगळ्या कला प्रकाराचे सादरीकरण केले. किनवट तालुक्यातील मथुरा लमाण समूह डोंगरगाव तांडा यांनी धिरो धिरो पारंपारिक आदिवासी नृत्याचे सादरीकरण केले. प्रशांत गाजरे व संच यांनी ताल संकिर्तन सादर केले. यामुळे सर्व वातावरण भक्तीमय झाले होते. अशा विविध कलाकारांनी आप-आपल्या उत्कृष्ट कला सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली.
त्यानंतर ‘आदि माया आदि शक्ती ‘ हा कार्यक्रम सादर करण्यात आला. शुशांत शेलार या सिने कलाकारांच्या संकल्पना आणि दिग्दर्शनात पूर्वी भावे, कौस्तूभ दिवाण यांच्या निवेदनात प्रसिद्ध आनंदी जोशी यांच्या गायनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. प्रसिद्ध कलाकार प्रार्थना बेहेरे, अस्मिता सुर्वे, राजेश्वरी खरात, अंजली जाधव, श्वेता खरात आणि संच यांच्यासह इतर कलाकारांनी ‘आदि माया आदि शक्ती’ चा नृत्याच्या माध्यमातून जागर केला. या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांच्यासह प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी परिवारासह उपस्थित होते.
बचत गटांना भेटी द्या – या कार्यक्रम स्थळी विविध विभागांनी तसेच बचतगटांनी आकर्षक विविध वस्तु व पदार्थाचे स्टॉल लावले आहेत. नागरिकांनी या स्टॉलला भेट देवून पाहणी व खरेदी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
प्रवेश निःशुल्क, सर्वांसाठी खुला – जिल्हा प्रशासनाने हा कार्यक्रम सामान्यातील सामान्य माणसाने बघावा यासाठी आयोजित केलेला आहे. त्यामुळे कोणत्याही प्रवेशिका किंवा पासेसची या ठिकाणी आवश्यकता नाही. जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने आपल्या कुटुंबासह या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
आजचे कार्यक्रम – महासंस्कृती महोत्सवात 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यत जल्लोष या कार्यक्रमात सुप्रसिद्ध सिने व नाटय कलावंताचा बहारदार कार्यक्रम होणार आहे. यात नृत्य, स्कीट, गायन तसेच नांदेड जिल्ह्यातील निमंत्रित प्रथितयश कलावंतासह अंशुमन विचारे व किशोरी अंबिये यांचेही सादरीकरण होणार आहे. तरी नागरिकांनी सहपरिवार या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.