राजकिय

मराठवाड्यातील परिस्थिती पाहता सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करावा – नाना पटोले

मुंबई। राज्यातील अनेक भागात शेतीची अत्यंत वाईट अवस्था झालेली आहे. कमी पाऊस पडल्याने मराठवाड्यात दुष्काळाची स्थिती आहे. मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये चारपट वाढ झाली आहे. जायकवाडी धरणात केवळ ४० टक्के पाणीसाठा आहे, धरणाच्या वरच्या भागातील धरणातून जायकवाडीत पाणी सोडण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत त्याचे सरकारने पालन करावे तसेच मराठवाड्यातील परिस्थिती पाहता राज्य सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची मराठवाडा विभागाची आढावा छत्रपती संभाजीनगर येथे पार पडली. यावेळी छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर नांदेड, हिंगोली, परभणी धाराशिव, बीड या जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि मराठवाडा विभागाचे प्रभारी नसीम खान, माजी मंत्री अमित देशमुख, आ. सुरेश वरपुडकर, माजी मंत्री डी. पी. सावंत, अनिल पटेल, माजी आमदार अमर राजूरकर, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, छत्रपती संभाजीनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुढे म्हणाले की,सात तारखेपासून विभागानिहाय आढावा बैठका सुरु आहेत. आज मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला. उदयपूर शिबिरातील बैठकीत घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी झालेली आहे की नाही त्याचा आढावा घेतला जात आहे. संघटनात्मक बांधणी मजबूत करून प्रत्येक घटकापर्यंत काँग्रेस विचार पोहचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. काँग्रेस पक्षाने जातनिहाय जनगणना करण्याची भूमिका घेतलेली आहे. उदयपूर शिबिरातही काँग्रेसने यासंदर्भात निर्णय घेतला होता.

आरक्षणाच्या प्रश्नावरून दोन समाजात वाद होताना दिसत आहेत. २०१४ मध्ये भाजपाने मराठा, धनगर, गोवारी, ठाकूर समाजाच्या लोकांना आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते पण देशात व राज्यात भाजपाचे सरकार आले पण त्यांनी आरक्षण त्यांनी दिले नाही. २०२१ साली जनगणना होणे अपेक्षित होते पण ती आजपर्यंत झालेली नाही, भाजपा मुद्दाम जनगणना करत नाही. संभाजी नगरमधील घाटी रुग्णालय, नांदेड, नागपूर येथील शासकीय रुग्णालयात औषधे मिळाली नाहीत म्हणून लोकांचे मृत्यू झाले. उच्च न्यायालयानेही सरकारवर याप्रश्नी कडक तोशेरे ओढले पण भाजपाचे आंधळे, बहिरे सरकार त्याकडे लक्ष देत नाही.

केंद्रातील भाजपाचे सरकार विरोधी पक्षाला वाईट वागणूक देत आहे. दडपशाही व दहशत निर्माण करत आहे. केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करत आहे. सोनियाजी गांधी व राहुलजी गांधी यांनाही भाजपा सरकारने चौकशीच्या नावाखाली अत्यंत वाईट वागणूक दिली. सोनियाजी गांधी आजारी असतानाही भाजपा सरकारने त्यांना ईडीच्या कार्यालयात बोलावून चौकशीच्या नावाखाली त्रास दिला. सोनियाजी व राहुलजी यांचा भाजपा सरकारने केलेला हा अपमान काँग्रेस कार्यकर्ता कदापी विसरणार नाही.

यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, नांदेडच्या रुग्णालयात वैद्यकीय कर्मचारी अधिकारी यांची कमतरता आहे, केवळ तीन नर्सेस होत्या. औषधांची कमतरता होती, सरकारने आरोग्य विभागाकडे खूप लक्ष देण्याची गरज आहे. सर्वच शासकीय पदे सरसकट कंत्राटी पद्धतीने भरु नयेत. तहसिलदार व नायब तहसिलदार अर्धन्यायीक पदे खाजगी पद्धतीने भरू नयेत. सफाई कामगार, सुरक्षा रक्षक सारखी पदे कंत्राटी पद्धतीने भरली जाऊ शकतात पण महत्वाची शासकीय पदे कंत्राटी पद्धतीने भरु नयेत. आरोग्य व शिक्षण ही सरकारची जबाबदारी आहे. त्यातही दत्तक योजना सारखे प्रकार आणले जात आहेत. राज्यात आज शिक्षक, पोलीस दलासह विविध विभागात रिक्त जागा आहेत सरकार त्या रिक्त जागा का भरत नाही? असा सवालही चव्हाण यांनी केला आहे.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!