गोरठ्यातील साहित्य चळवळ वाचन संस्कृतीला बळकटी देणारी :जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
भोकर। संत कवि दासगणू महाराजांच्या पावन पदस्पर्शाने पुनीत झालेल्या आणि त्यांच्या अमृतवाणीने भक्तिरसात न्हाऊन निघालेल्या गोरठा नगरीत आज संपन्न होत असलेले चौथे मराठी साहित्य संमेलन ही चळवळ वाचन संस्कृतीला बळकट देणारी आहे . अशा शब्दात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी उमरी तालुक्यातील गोरठा येथे पार पडलेल्या चौथ्या मराठी साहित्य संमेलनाचा गौरव केला. प्राचार्य ग पि मनुरकर व्यासपीठावर पार पडलेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी संवेदनशील कवयित्री वृषाली किन्हाळकर ह्या होत्या.
गोरठा येथे आज दिनांक 28 फेब्रुवारी रोजी वरदनंद प्रतिष्ठान गोरटे यांच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त चौथे मराठी साहित्य संमेलन ज्येष्ठ कवयित्री डॉक्टर वृषाली किन्हाळकर यांचे अध्यक्षतेखाली पार पडलेल्या साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथ दिंडी लेझीम टाळ मृदंगाच्या तालावर करण्यात आली. ग्रंथ प्रदर्शनाचे आणि संतोष तळेगाव यांच्यानांदेड जिल्ह्यातील साहित्यिक यांच्या परिचयाचे चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन झाल्यानंतर संमेलनाच्या उद्घाटन समारंभात बोलताना उद्घाटक जिल्हाधिकारी अभिजीत राऊत पुढे म्हणाले की, अलीकडच्या काळात वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे . मुलांपासून तरुणांपर्यंत मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे वाचन संस्कृतीकडे आपण पाठ फिरवत आहोत .
विद्यार्थी केवळ अभ्यासापुरते वाचन करत आहेत परंतु यामुळे वाचन संस्कृती टिकणे कठीण आहे . त्यामुळे वाचन संस्कृती टिकावी यासाठी अशा साहित्य संमेलनाची नितांत गरज आहे . ज्येष्ठ कवी देविदास फुलारी यांनी आपल्या मातोश्रींच्या स्मृतीदिनी साहित्य संमेलनाचा राबविलेला उपक्रम हा खऱ्या अर्थाने आईच्या कर्तुत्वाला आदरांजली आहे . अशा संमेलनाची नितांत गरज असून या संमेलनातून वाचन चळवळ अधिक भक्कम झाली पाहिजे . विद्यार्थी आणि नव तरुणांना त्यातून प्रेरणा मिळाली पाहिजे . यासाठी अधिकाधिक संमेलन घ्यावीत त्यासाठी जिल्हा प्रशासनाचे सहकार्य करण्यास आम्ही तयार आहोत असे जिल्हाधिकारी राऊत यांनी अश्वस्त केले.
जिथे गुरूला ग्रंथ मांडले आहे त्या पावनभूमीत ग्रंथ जर गुरु झाले तर निश्चितपणे ज्ञानाची भरभराट होईल. त्यातून विद्यार्थी मोठ्या प्रमाणात घडतील. त्यासाठी पुस्तकांचा प्रसार ,प्रचार करणे काळाची गरज झाली आहे. अशा साहित्य संमेलनामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल असे सांगत विद्यार्थ्यांनी आपण कोणाला आदर्श मानणार आहोत याचे चिंतन करण्याची गरज आहे . आपण खऱ्या व्यक्तिमत्त्वांचा आदर्श घ्यावा ज्यामुळे आपल्याला प्रेरणा मिळेल आणि अशी प्रेरणा देण्याचे काम साहित्य संमेलनातून व्हावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. संमेलनाचे सूत्रसंचालन जेष्ठ कथाकार दिगंबर कदम यांनी केले तर आभार रमेश फुलारी यांनी मांडले.
यावेळी साहित्य संमेलनासाठी डॉ. तरु जिंदल, मराठवाडा साहित्य परिषद नांदेड शाखेचे अध्यक्ष प्रभाकर कानडखेडकर, एडवोकेट विजयकुमार भोपी ,एडवोकेट भाऊसाहेब गोरठेकर, सरपंच स्वरूपा सूर्यवंशी , स्वागत अध्यक्ष शिरीष देशमुख गोरठेकर दत्ता डांगे, तहसीलदार प्रशांत थोरात, राम तरटे,जेष्ठ साहित्यीक देविदास फुलारी, पत्रकार विठ्ठल फुलारी, नंदकुमार कोसबतवार, डॉ.माधव विभुते,डॉ. रामेश्वर भाले,बाळासाहेब पाटील रावणगावकर, सुरेश बिल्लेवाड,प्रा.पंजाब चव्हाण, बालाजी गोमासे, उपस्थिती होती. याच वेळी आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डॉ. तरू जिंदल यांचा काशीबाई भाऊराव फुलारी स्मृती नारायणी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. रोख पाच हजार रुपये , मानपत्र असे ह्या पुरस्काराचे स्वरूप होते.
साहित्य संमेलनाचे प्रास्ताविक ज्येष्ठ कवी देविदास फुलारी यांनी मानले तर स्वागत अध्यक्ष शिरीषभाऊ देशमुख गोरठेकर यांनी उपस्थित मान्यवर आणि साहित्य प्रेमींचे स्वागत केले. डॉ. गोविंद नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या परिसंवादात संत विचाराच्या अभावाने अराजकता वाढत आहे या विषयावर बाबाराव विश्वकर्मा यांनी आपले विचार श्रोत्यांसमोर ठेवले. प्रसिद्ध कथाकार दिगंबर कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कथाकथन सत्रात राम तरटे, धाराशिव शिराळे यांनी आपल्या कथा सादर करून उपस्थितांची मने जिंकली तर जगन शेळके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कवी संमेलनाने साहित्य संमेलनात रंगत भरली.
साहित्यातून माणूस उभा राहिला पाहिजे : डॉ. वृषाली किन्हाळकर
साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर वृषाली किन्हाळकर आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाल्या की , अलीकडच्या काळात माणूस माणसापासून दुरावत चालला आहे . माणसांना माणसाशी बोलण्यासाठी वेळ नाही . आपण मोबाईल व्हाट्सअप, सोशल माध्यमांमुळे इतके एकाकी पडलो आहोत की आता एकमेकाला बोलण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही. एकमेकाला समजून घेण्यासाठी वेळ नाही. त्यातून नाती दुरावत आहेत. दुरावत चाललेल्या नात्यांमध्ये , संवादामुळे आपली संस्कृती लोप पावते की काय अशी भीती निर्माण झाली आहे आणि त्यामुळे ही परिस्थितीत आपण एकमेकांशी मुक्तपणे बोललो पाहिजे. एकमेकांशी मुक्तपणे संवाद साधला पाहिजे . एकमेकांची नाती जपली पाहिजेत . माणसे जपली पाहिजेत.त्यासाठी विचारांची खोली जपण्याची आवश्यकता आहे .
समाज माध्यमांचे आपण जितके बळी जाऊ तितके आपण एकाकी पडू आणि आपला संवाद दुरावात जाईल आणि हा संवाद दुरावत गेला तर समाज लयाला , संवेदना , माणुसकी लायास जाण्याची शक्यता असते अशी भीती व्यक्त करतानाच साहित्यातून संवाद साधणारी माणसे निर्माण करता आली पाहिजेत . माणसा – माणसात संवाद निर्माण करणारे साहित्य निर्माण झाले पाहिजे . अशा साहित्यामुळेच संस्कृतीचे आपले गतवैभव टिकून राहील. आपली संस्कृती टिकून राहील आणि माणूस टिकून राहील असा विश्वासही वृषाली किन्हाळकर यांनी व्यक्त केला.