श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| माहूर तालुक्यातील सोनापीर दर्गाह परिसरात बिबट्याने परवा घोड्याची शिकार केली तर आज म्हशीची शिकार केल्याने परिसरातील नागरिकांत दहशत पसरली असून माहूर शहरात बिबट्याचा शिरकाव झाल्याने वन विभागाने सतर्कता बाळगणे गरजेचे असल्याची चर्चा करत होत आहे

आज सकाळी बिबट्याने एका शेतकऱ्याच्या म्हशीच्या पारडीवर हल्ला करून शिकार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिक वनविभागाच्या निष्क्रियतेवर नाराजी व्यक्त करीत आहेत.परिसरात बिबट्याचे अस्तित्व असल्याची माहिती वनविभागाला पूर्वीपासूनच होती. तरीदेखील प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात वनविभाग पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

ज्या शेतकऱ्याच्या म्हशीच्या बछड्याचा बळी गेला, त्यांनी याबाबत वनविभागाकडे तक्रार अर्ज दिला आहे. मात्र घटनेनंतर इतका वेळ उलटूनही पंचनाम्यासाठी अधिकारी घटनास्थळी न आल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

दरम्यान, या प्रकरणावर वनाधिकारी माहूर यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला असता त्यांनी फोन उचलण्याचे टाळले. त्यामुळे वनविभागाच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
