आर्टिकलनांदेड

मराठवाड्यात महाविद्यालय वाटपात राष्ट्रवादीच्या आमदारांना झुकते माप

महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटावर मेहरबान झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या गटाच्या आमदारांना मराठवाड्यात मनसोक्तपणे महाविद्यालय वाटप करण्यात आले आहेत. महाराष्ट्र शासन नवीन महाविद्यालयांसाठी दरवर्षी इरादापत्र जाहीर करते. यासंदर्भात यंदाचा शासनाचा ‘जीआर’ नुकताच निघाला असून त्यामध्ये मराठवाड्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना झुकते माप देण्यात आले आहे. विशेष म्हणजे भाजपच्या आमदारांनी शिफारस करूनही अनेक शैक्षणिक संस्थांना नवीन महाविद्यालय देण्यात आलेले नाही. भाजपशी संबंधित शैक्षणिक संस्थांना नवीन महाविद्यालय मिळालेले नसल्याने हा शैक्षणिक स्फोट वेगळाच निकाल देणार आहे. ‘राष्ट्रवादीच्या संस्था तुपाशी… तर भाजप संबंधित संस्था उपाशी’ असे काहीसे चित्र मराठवाड्यात दिसून येत आहे. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात राजकारण येऊ नये, असे अनेक जाणकारांचे मत आहे. परंतु अलीकडच्या काळात शिक्षणासारख्या क्षेत्रात राजकीय मंडळींनी शिरकाव करून त्यात जास्त रस घेतला आहे. यामुळे शिक्षणासारखे क्षेत्र अतिशय वेगळ्या दिशेला जात आहे . त्याचा परिणाम समाजात लगेच दिसणार नसला तरी भविष्यात दूरगामी परिणाम नक्कीच दिसतील.

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाविद्यालय वाटप करत असताना मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना जवळ केल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे भाजप समर्थक तसेच ईमान इतबारे शिक्षण देऊ पाहणाऱ्या अनेक संस्थांवर अन्याय झाला आहे. विशेष म्हणजे विधी महाविद्यालय वाटप करत असताना चांगले काम करणाऱ्या संस्थांवर अन्याय झाला आहे. विधीक्षेत्राच्या माध्यमातून समाजात न्याय देऊ पाहणाऱ्या संस्थांवरच अन्याय करत मंत्री चंद्रकांत दादांनी मराठवाड्यात एका वेगळ्या शैक्षणिक वादाला तोंड फोडले आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर येथे सर्वात जुने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आहे. त्या अंतर्गत यावर्षी नवीन अकरा महाविद्यालयांना इरादा पत्रद्वारे परवानगी देण्यात आली आहे. त्यापैकी तीन विधी महाविद्यालय आहेत. त्यातही राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार असलेल्या संस्थांनाच परवानगी देण्यात आली आहे. इतर काही संस्थांनी नवीन विधी महाविद्यालयांचा प्रस्ताव दाखल केला होता. परंतु त्या सर्वांवर अन्याय करत त्यांना इरादापत्र नाकारण्यात आले आहे. अ

साच काहीसा प्रकार स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत झाला आहे. या विद्यापीठ अंतर्गत असलेल्या ग्रामोदय सेवाभावी संस्था बाबुळगाव , तालुका वसमत, जिल्हा हिंगोली या संस्थेला एकदाच तीन नवीन महाविद्यालय मंजूर करण्यात आले आहेत. त्यामध्ये एक वसुमती विधी महाविद्यालय , दुसरे कै. गोपाळराव पाटील ग्रामीण व्यवस्थापन महाविद्यालय व तिसरे राजे संभाजी व्यावसायिक व कौशल्य विकास वरिष्ठ महाविद्यालय मंजूर करण्यात आले आहेत. या संस्थेचे अध्यक्ष अजित पवार गटाचे आमदार चंद्रकांत उर्फ राजू नवघरे हे आहेत. तसेच परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील आमदार मेघना बोर्डीकर यांच्याशी संबंधित असलेल्या कै. वामनराव कदम बोर्डीकर सेवा संस्था जिंतूर, जिल्हा परभणी यांना नवीन विधी महाविद्यालय मंजूर केले आहे. बोर्डीकर विधी महाविद्यालय सेलू ,जिल्हा परभणी येथे हे नवीन महाविद्यालय मंजूर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे सेलू येथे दोन विधी महाविद्यालय मंजूर करण्यात आले असून दुसरे महाविद्यालय यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ शास्त्रीनगर सेलूच्या संस्थेला मंजूर केले आहे. यशवंत विधी महाविद्यालय असे त्याचे नाव आहे.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे कोथरूड, पुणे येथून विधानसभेवर गेलेले आहेत. पुणे येथील कै. भाऊसाहेब रंगारी हे भावसार समाजाचे असून त्यांना केवळ पुण्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळा मान आहे. दरवर्षी गणेशोत्सवकाळात गणपती स्थापन करण्याचा विशेष मान भाऊसाहेब रंगारी गणेश मंडळाला आहे. भावसार समाजाच्या नावाने महाराष्ट्रातील पहिले भावसार विधी महाविद्यालय,वसमत जिल्हा हिंगोली येथे स्थापन होणार होते. त्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ , नांदेड अंतर्गत रितसर प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. विद्यापीठाच्या तज्ञ कमिटीने त्या महाविद्यालयाची पाहणी केली . त्यानंतर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने सकारात्मक अहवाल शासनाकडे पाठविला होता . त्यामुळे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची त्यास अंतिम मंजुरी मिळणे अपेक्षित होते. परंतु भावसार समाजाच्या या विधी महाविद्यालयाला मंत्र्यांनी केराची टोपली दाखविली. व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चंद्रकांत नवघरे यांच्या संस्थेला त्या ठिकाणी विधी महाविद्यालय मंजूर केले.

भावसार समाजाच्यावतीने या ठिकाणी विधी महाविद्यालय मंजूर करण्याची मागणी महाराष्ट्रातील भावसार समाजाकडून करण्यात आली होती. भाजपचे आ. डॉ. तुषार राठोड यांनीही मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे याबाबत शिफारस देखील केली होती. तसेच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून भावसार समाजाच्यावतीने मंत्री चंद्रकांत पाटील यांना यासाठी निवेदन देखील देण्यात आले होते . तरी देखील महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येने असणाऱ्या भावसार समाजाच्या मागणीकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले . यामुळे महाराष्ट्रातील भावसार समाज संतप्त बनला आहे. मराठवाड्यात अगोदरच भाजपच्या समर्थकांना अलीकडच्या राजकीय घडामोडीमुळे नाराजीचा सामना करावा लागत आहे. त्यात महाविद्यालय वाटपाच्या या प्रक्रियेमुळे मराठवाड्यात भाजपविरुद्ध अधिकच नाराजी पसरली आहे.भाजपेतर आमदार असलेल्या राष्ट्रवादींच्या संस्थांना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी झुकते माप दिल्याने भाजपसह चंद्रकांत पाटील यांच्या या धोरणाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मराठवाड्यात दोन विद्यापीठ असून छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत नवीन अकरा महाविद्यालय तर नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत सर्वाधिक म्हणजेच वीस नवीन महाविद्यालय मंजूर करण्यात आले आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा बोलबाला आहे.

राजकारण्यांच्या तावडीतून शिक्षण संस्था मुक्त कराव्यात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभरात शिक्षण प्रणालीत बदल करण्यासाठी ‘ न्यू एज्युकेशन पॉलिसी’ अवलंबली. यामुळे शैक्षणिक क्षेत्रात एक अभिनव क्रांती होणार आहे, हे निश्चित आहे. या चांगल्या निर्णयाचे स्वागतच होत आहे . वेगवेगळे बदल व चांगले नियम लागू करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक उत्कृष्ट शासनाचा पायंडा पडला आहे. त्यांनी देशभरातील राजकारण्यांच्या तावडीतून शिक्षण संस्था मुक्त कराव्यात. राजकारणी मंडळींच्या हातात शिक्षण संस्था असतील तर भविष्यात शिक्षणाचे वाटोळेच होणार आहे. त्यामुळे कुठल्याही राजकारण्यांच्या शिक्षण संस्था असू नयेत असतील तर त्यांना राजकारणात कुठलेही पद देऊ नये, असा कायदाच होणे अपेक्षित आहे. यासाठी शिक्षण क्षेत्रातील तज्ञ लोकांनी तसेच कायदे क्षेत्रातील तज्ञांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. सुरुवातीला हे अशक्य वाटत असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे मनावर घेतले तर हा कायदाही व्हायला वेळ लागणार नाही. राजकारणी लोकांना सगळेच हवे असते . त्यामुळे किमान शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात त्यांचा हस्तक्षेप नसेल तर खरे काम करणाऱ्या शैक्षणिक संस्थांना पुढे येता येईल.

डॉ.‌ अभयकुमार दांडगे, मराठवाडा वार्तापत्र ( १७/२/२०२४ )abhaydandage@gmail.com

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!