हिमायतनगरात वानराच्या टोळीतील मोरख्याने चिमुकलीवर हल्ला चढविला; चिमुकली गंभीर जखमी
हिमायतनगर,अनिल मादसवार| शहर व परिसरात मागील काही महिन्यापासून वानरांच्या कळपाने उच्छाद घातला आहे. त्यातील एका बिना शेपटीच्या वानराने आज एका पहिल्या वर्गातील चिमुकल्या मुलीवर धाव घेतली. आणि वानराने नखे व दाताने गमाभीर जखमी केले आहे. हि घटना शहरातील बजरंग चौक परिसरात सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली आहे. नागरिकांनी हटकल्याने वानर पळून गेले असून, सदर मुलीला उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे. वन विभागाचे काही कर्मचारी या पेठेत दाखल झाले होते. बराच वेळ शोध घेतला. मात्र, वानर नक्की कोठे गेले ते समजले नाही.
हिमायतनगर शहर हे तेलंगणा आणि विदर्भाच्या सीमारेषेवर आहे. सध्या उन्हाचा कडक वाढला असून, वानरांचे टोळके आता गावकुशीत येऊ लाल आहेत. एरवी देखील काही वानरांचे टोळके व माकडे शहरात धुमाकूळ घालतच असतात. याबाबत अनेकदा वनविभागाला नागरिकांनी सूचित केले मात्र या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यात वनविभाग अपयशी ठरला आहे. या वानरांच्या टोळक्याने शहरातील रुखमणी नगर, परमेश्वर गल्ली, कालीन्का गल्ली, बजरंग चौकसह शहरातील अनेक भागात धुमाकूळ घातला आहे. या वानरांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे.
माकडांसह वानरांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत असताना आज दि.०६ शनिवारी कु. सानिका संतोष नरवाडे वय 7 वर्ष हि इयत्ता पहिल्या वर्गाची परीक्षा देऊन घरी परत येत असताना अचानक बजरंग चौक परिसरात राहत्या घराजवळ अचानक वानराच्या टोळीतील मोरख्याने चिमुकलीवर हल्ला चढविला. आणि तीच्या कमरेला दातांनी आणि नखांनी पाठीमागून चावा घेऊन गंभीर जखमी केले आहे. हा प्रकार लक्षात येताच काही लोकांनी वानराना हाकलून लावले, आणि तात्काळ नातेवाईकांच्या मदतीने चिमुकल्या मुलीस हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
येथील रुग्णालयात कु.सानिकावर प्राथमिक उपचार करण्यात आला असून, अंगात विषाचा प्रभाव पसरू नये म्हणून पुढील अँटिबाईट उपचारासाठी नांदेडला रेफर करण्यात आले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली असून, याबाबत उद्या ऑनलाईन नोंद घेऊ असे वनपाल यांनी सांगितले असून, जखमी झालेल्या चिमुकलीस मदत मिळवून देऊ असे आश्वासन त्यांनी दिले आहे. तसेच वानरांच्या टोळीचा व माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी वरिष्ठ स्तरावरील टीमला पाचारण करण्यात येईल असेही सांगितले आहे.