आशा व गटप्रर्वत्तक ताईंना विना मोबदलाऑनलाईन काम करण्याची सक्ती केल्यास अधिकारी – कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार : कॉ.उज्वला पडलवार
नांदेड,अनिल मादसवार। अत्यंत तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या आरोग्य अभियानातील कर्मचारी आशा वर्कर व गटप्रवर्तक ताईंना ऑनलाइन व विना मोबदला काम लावण्यात येत असल्याच्या तक्रारी संघटनेकडे प्राप्त होत असून, अनेक ठिकाणी आर्थिक लूट करण्यात येत असल्याच्या घटना देखील जिल्हाभर गाजत आहेत.
सर्वोच न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार देशातील कोणत्याही कामगार कर्मचाऱ्यांना विना मोबदला कोणतेही काम लावू नयेत असे निर्देश असताना नांदेड जिल्ह्यात मात्र पायमली होताना दिसत आहे. आरोग्य अभियानातील आशा व गटप्रवर्तक ग्रामीण भागात आरोग्याचा कणा म्हणून काम करतात परंतु आता त्यांना ऑनलाईन कामाची सक्ती केली जात आहे शिक्षण कमी असल्याने त्यांना ऑनलाइन काम जमत नाही ग्रामीण भागात नेटवर्क अडचण अशा अनेक अडचणी असताना देखील आशा आणि गटप्रवर्तक ताईंना फुकट राबवून घेतले जात आहे.
हा प्रकार गंभीर असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ते तातडीने थांबवावे आणि जर कुणी विना मोबदला राबवून घेत असेल किंवा ऑनलाइन काम सांगत असतील तर संबंधितावर तात्काळ कारवाई करून आशा व गट प्रवर्तक यांच्या श्रमाची होणारी लूट थांबवावी अन्यथा दहा ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषदेवर भव्य मोर्चा काढून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निदर्शनास आणून देत आशा आणि गटप्रवर्तक ताईंच्या श्रमाची लूट करून शोषण करणाऱ्या अधिकार्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा आशा व गट प्रवर्तक फेडरेशनच्या जिल्हाध्यक्षा कॉ.उज्वला पडलवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
नांदेड जिल्ह्यातील काही तालुक्यात वरिष्ठ अधिकारीच आशा वर्कर व गटप्रवर्तक ताईंना विना मोबदला काम लावून कायद्याचे उल्लंघन करीत आहेत तसेच पैशाची मागणी देखील करीत असल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कडे लेखी स्वरूपात करण्यात येणार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद आरोग्य विभागाने ज्या तालुक्यातून तक्रारी येतील त्यांच्यावर कडक करावाई करावी अशी मागणी जिल्ह्यातून होत आहे. दोषींची तालुका निहाय चौकशी करून दोशींवर कायदेशीर कारवाई करून जिल्हाभरातील आशा वर्कर्स व गटप्रवर्तक ताईंना न्याय द्यावे असे देखील कॉ.पडलवार म्हणाल्या.
ग्रामीण भागामध्ये अत्यंत तुटपुंज्या मानधनांवर महिला काम करतात. महागाईच्या काळात मिळते त्याच मानधनांवर कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नाही.त्यामुळे संघटनेच्या माध्यमातून मानधनांमध्ये थोडीफार वाढ झाली परंतु तेही वेळेवर मिळत नाही. त्यासाठी केंद्र आणि राज्य शासनासोबत किमान वेतन असो किंवा कर्मचारी दर्जा असो यासाठी आम्ही संघटनेच्या माध्यमातून लढत आहोत. परंतु जर कार्यक्षेत्रात काम करताना तालुक्याचे काही वरिष्ठ जर विना मोबदला कामाची मागणी करत असतील तर ते अत्यंत दुर्दैवी बाब आहे. महिलांना त्रास देणाऱ्यांना किंवा त्यांच्या श्रमाचे शोषण करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. असा इशारा देण्यात आला आहे.