हिमायतनगरात व्हायरल फीव्हरमुळे दवाखाने हाऊसफुल्ल; डासांची उत्पत्ती वाढल्याने नागरिक त्रस्त
हिमायतनगर,अनिल मादसवार| शहर आणि तालुका परिसरात डेंग्यू सदृश्य आजार आणि चिकनगुनियाचा फैलाव सुरू झाला आहे. व्हायरल फीव्हर आणि डासांच्या वाढत्या उत्पत्तीमुळे दिवसेंदिवस रुग्णांमध्ये वाढ होते असून, शासकीय रुग्णालयासह दवाखाने हाऊसफुल्ल झाले आहेत. असे असताना देखील प्रभारींवर चालणाऱ्या नगरपंचायतीच्या स्वच्छता विभागाचे धिंडवडे निघत असताना सतर्कता दाखविली जात नसल्याने शहरातील नागरीकातून नगरपंचायतविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. नुकतेच डेंग्यू सदृश्य आजाराने एका बालकाचा मृत्यू झाल्याची चर्चा शहरात सुरु झाल्याने नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हि बाब लक्षात घेऊन डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाने धूर फवारणी करून शहरातील तुंबलेल्या नाल्यांची तातडीने सफाई करावी. आणि शहरातील जनतेचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा अन्यथा नगरपंचायतच्या विरोधात जनता रस्त्यावर उतरण्याच्या बेतात असल्याचे अनेकांनी “न्यूजफ्लॅश360.डॉटइन”शी बोलताना सांगितले आहे.
पावसाने विश्रांती घेतली असून, आता साथीच्या आजाराने डोकेवर काढले आहे. गेल्या काही महिन्यापासून शहरातील ठीक ठिकाणच्या नाल्या तुंबून आणि कचऱ्याचे ढिगारे वाढू लागल्याने अस्वच्छतेचा कहर माजला आहे. मुख्य नाले व गटारांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा व घाण साचल्यामुळे तुडुंब भरून पाणी रस्त्यावर वाहत असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरून डासांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. नाल्यांमध्ये कचऱ्यांचे ढिग साचल्यामुळे यावर मोकाट कुत्रे व डुकरांचा मोठ्या प्रमाणात संचार वाढला असून, परिसरात रोगराई पसरू लागली आहे. त्यातच वातावरणात झालेला बदल यामुळे व्हायरल फिवर वाढून शहर व तालुक्यात सर्दी, खोकला, डायरिया, मलेरिया, चिकनगुनिया, टायफाईड, ताप, डेंगी यासह इतर साथीचे आजाराने त्रस्त झालेल्या रुग्णाचे लोंढेच्या लोंढे हिमायतनगर व नांदेड सारख्या रुग्णालयाकडे धाव घेत आहेत.
सध्याच्या वातावरणात दिवसभर उष्णता आणि रात्रीला सर्दी अश्या बदलामुळे आणि अस्वच्छतेमुळे वाढलेली डासांची उत्पत्ती साथीचे आजार व डेंगीसदृश्य रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ करण्यास कारणीभूत ठरते आहे. हिमायतनगर शहरातील एका बालकाचा डेंगीसदृश्य आजाराने मृत्यू झाल्याचे चर्चा शहरात होत असून, त्यांच्याच घरातील आणखी एका बालिका नांदेड येथे उपचार घेत असल्याचे सांगितले जात आहे. यास आरोग्य विभागाने सध्यातरी दुजोरा दिला नसला तरी साथीच्या आजाराची हि परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी नगरपंचायत व आरोग्य प्रशासनाने तातडीने यावर उपाययोजना करून गावात फाँगिंग मशीनने फवारणी करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
महिन्याला लाखो रुपये खर्च करूनही नगरपंचायतीच्या स्वच्छता विभागाचे निघत आहेत धिंडवडे
शहरात वाढलेल्या अस्वच्छतेमुळे डासांची उत्पत्ती प्रचंड प्रमाणात वाढली आहे, यामुळे डायरिया, डेंग्यू, मलेरिया, ताप, टायफाईड, चिकनगुनिया यासह इतर साथीचे आजार जडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शहराच्या स्वच्छतेसाठी महिन्याला लाखो रुपये खर्चूनही शहरात घाणीचे साम्राज्य जैसेथेच दिसत असल्याने हा पैसे कुठे खर्च होतोय..? असा प्रश्न नागरिक विचारीत आहेत. या बाबीकडे जिल्हाधिकारी अभिजित राऊत नांदेड यांनी लक्ष देऊन नपच्या स्वच्छतेचा ठेका घेतलेल्या ठेकेदारांसह स्वच्छता निरीक्षकाच्या निष्क्रिय कारभाराची चौकशी करावी. आणि स्वच्छता निरीक्षक शहरातील स्वच्छतेकडे लक्ष का..? देत नाहीत याची चौकशी होऊन शहरवासीयांना संभाव्य साथीच्या आजारापासून मुक्तता देण्यासाठी तातडीने तुंबलेल्या नाल्यांची सफाई करून जागोजाग साचणाऱ्या पाण्यावर कायम तोडगा काढावा तसेच डासांची उत्पत्ती थांबविण्यासाठी फाँगिंग मशीनने फवारणी करावी अशी रास्त मागणी शहरवासीय नागरिकांतुन केली जात आहे.
हिमायतनगर शहरातल्या सराफ लाईन मुख्य रोडवर असलेल्या वर्धमान मेन्सवेयरच्या ठिकाणी वारंवार नाली तुंबून दुर्गंधीयुक्त पाणी थेट रस्त्यावर येत होते. यामुळे नागरिकांना आणि दुकानात येणाऱ्या ग्राहकांना होणार त्रास होत होता. याबाबत येथील नगरपंचायत प्रशासनाला अनेकदा सांगूनही यात सुधारणा अथवा कायम नळीची सफाई केली जात नव्हती. त्यामुळे स्वतः दुकानदाराने स्वखर्चातून हि नाली उपसून काढून घेतली तसेच दोन्ही बाजूने सिमेंट कॉंक्रेटीकरण करून तुंबलेली नाली साफ करून घेतली आहे. हि बाब नागरपंचायत प्रश्नाचे धिंडवडे काढणारी असून, अखेर उपसण्यात आलेल्या नालीतील घाण नगरपंचायतीने नेऊन फेकली. मात्र जोपर्यंत नागरिक नाल्याची दुरुस्ती करून घेत नाहीत तोपर्यंत सफाई आणि स्वच्छतेच्या समस्येकडे नगरपंचायत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे यावरून दिसून येत आहे.