हिमायतनगर तालुक्यात उष्णतेची लाट; तरुणाचा मृत्यू उष्माघाताने झाल्याची चर्चा
हिमायतनगर| जिल्ह्यात अवकाळी पावसाने मागील आठवड्यात थैमान माजवल्यानंतर उन्हाचा पारा वाढला आहे. गेल्या १५ दिवसापासून हिमायतनगर शहर व तालुका परिसरात उष्णतेची लाट सुरु झाली आहे. सकाळी ९ वाजल्यापासून उन्हाचे चटके जाणवू लागल्याने शेतीसह इतर कामकाजात व्यत्यय निर्माण होत आहे. रस्ते निर्मनुष्य होत असून, उन्हाचे चटके लागून शहरातील परमेश्वर सूरजवाड नामक युवकाचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या तापमान वाढीमुळे जनता हैराण झाली आहे. सकाळपासूनच उन्हाच्या झळा बसत असल्याने अनेक जण घरातून बाहेर पडणं टाळत आहेत. वारंवार बदलणाऱ्या वातावरणामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहेत. सध्या हिमायतनगर शहर परिसरात ४० अंश सेल्सिअस पेक्षा अधिक तापमान वाढले असून, दुपारच्या वेळी शहरातून फिरताना उन्हाचे चटके असहाय होऊ लागले आहेत. त्यामुळे रस्ते शुकशुकाट दिसत आहेत.
गुरुवारी शहरातील युवक परमेश्वर सूरजवाड वय ३२ हा दिवसभर उन्हात काम करून रात्री घरी परतला होता. त्यावेळी जीव कासावीस करत असल्याचे घरच्यांना सांगितले होते. परत दुसऱ्या दिवशी सकाळी तो नित्याप्रमाणे कामासाठी बाहेर जाण्याच्या तयारीत असताना मयत परमेश्वरला उन्हामुळे घाम येऊन बी.पी. कमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. एक दिवस अगोदर अस्वस्थ वाटत असल्याने हिमायतनगर शहरातील ग्रामीण रुग्णालयात तपासणी करून औषधोपचार घेतल्याचे डॉक्टरांनी सांगितले परंत्तू नेमका मृत्यू कश्याने झाला हे समजू शकले नाही. परंत्तू शहरात सोशल मीडियावर युवकाचा मृतयू उष्माघाताने झाला असल्याचे बोलले जात होते. दरम्यान याबाबत हिमायतनगर पोलिसात कोणतीही नोंद झालेली नव्हती.
त्याच्या मृत्यूपश्चात पत्नी, आई, भाऊ, असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे सूरजवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पार्थिवावर दुपारी 2 वाजता भूमी लकडोबा चौक येथे हिंदू स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात येणार आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी सुरजवाड कुटुंबीयांची भेट घेणं सांत्वन करत धीर दिला.