देश-विदेशनांदेड

पासपोर्ट काढताय? अर्ज प्रक्रियेत मोठा बदल,डीजीलॉकर म्हणजे काय?

नवी दिल्ली। नवीन पासपोर्ट काढण्यासाठी अर्ज करायचा असल्यास, पासपोर्ट अर्ज प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. नवीन पासपोर्टसाठी अर्जदाराला आता डीजीलॉकरचा वापर करावा लागणार आहे. या डीजीलॉकरवर सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर, सरकारची अधिकृत वेबसाइट www.passportindia.gov.in द्वारे अर्जदार त्याचा पासपोर्ट अर्ज ऑनलाइन दाखल करू शकणार आहेत.

नवीन नियम कशासाठी?

पासपोर्ट अर्ज प्रक्रियेमध्ये डीजीलॉकरचा समावेश केवळ अर्ज प्रक्रियेला गती देण्यासाठीच नव्हे, तर ती कार्यक्षम बनवण्यासाठी करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, प्रत्यक्ष दस्तावेज पडताळणीची आवश्यकता कमी करण्यासाठी, देशभरातील विविध भागांतील पासपोर्ट सेवा केंद्रे आणि पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. या सगळ्यांच केंद्रांमधून अधिक वेगाने पारपत्रे दिली जातील, अशी अपेक्षा आहे.

डीजीलॉकर म्हणजे काय?

ही एक डिजिटल वॉलेट सेवा आहे. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स खात्याने डीजीलॉकर ही सुविधा दिली आहे. आता नागरिकांना पासपोर्ट देणाऱ्या परराष्ट्र खात्यानेही ही सेवा वापरण्याचे ठरवले आहे. या मूळ डीजीलॉकर सेवेत देशाचे नागरिक सरकारने जारी केलेले सर्व महत्त्वाचे दस्तऐवज सुरक्षितपणे ठेवू शकतात. वाहन चालवण्याचा परवाना, गुणपत्रिका, वाहन नोंदणी प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे यात वापरकर्त्यांना अपलोड करता येतात; तसेच आवश्यकतेनुसार वापरकर्त्यांना कधीही आणि कुठेही ती दाखवता येतात. सध्या उपलब्ध असणाऱ्या या सेवेत आता पासपोर्ट मिळण्याच्या प्रक्रियेची भर पडते आहे.

डीजीलॉकर कसे वापरावे?

डीजीलॉकर खाते सुरू करण्यासाठी वापरकर्त्यांना त्यांच्या मोबाइल क्रमांकासह नोंदणी करणे आवश्यक असते. हा मोबाइल क्रमांक ‘आधार’शी जोडलेला असणे बंधनकारक असते. डीजीलॉकर सुरू करताना वापरकर्त्याला त्याने ‘आधार’शी लिंक केलेल्या मोबाइल क्रमांकावर ‘वन टाइम पासकोड’ (ओटीपी) पाठवला जाईल. डीजीलॉकर खात्यात लॉग इन करण्यासाठी वापरकर्त्याला या ‘ओटीपी’ची आवश्यकता असेल. याशिवाय, भविष्यात डीजीलॉकरमध्ये कोणतेही बदल करायचे असतील, तर त्यासाठी ‘आधार’मध्येही बदल करावे लागतील.

कोणती कागदपत्रे ठेवता येतात?

कोणत्याही प्रकारचे दस्तावेज संग्रहित करण्यासाठी वापरकर्ते या प्रणालीचा वापर करू शकतात. परराष्ट्र मंत्रालयाने आता पासपोर्टचे ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी डीजीलॉकरद्वारे आधार कागदपत्रांचा वापर करण्यास परवानगी दिली आहे. डीजीलॉकरवर कोणतेही प्रमाणपत्र, वाहन चालवण्याचा परवाना, वाहन नोंदणी प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र आदी सुरक्षित ठेवता येते.

डीजीलॉकर का वापरायचे?

पासपोर्टची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी; तसेच अर्जदारांचे दस्तावेज सुरक्षित ठेवण्यासाठी हे ‘व्हर्च्युअल लॉकर’ सरकारने सादर केले आहेत. अर्जदारांनी त्यांचे दस्तावेज अपलोड करण्यासाठी डीजीलॉकर वापरल्यास, त्यांना अर्ज प्रक्रियेत कोणत्याही कागदपत्रांच्या प्रत्यक्ष प्रती (हार्ड कॉपी) सोबत ठेवण्याची आवश्यकता नसेल. यामुळे एकूण प्रक्रियेचा वेळ कमी होण्यास मदत होईल; तसेच पासपोर्ट अर्ज प्रक्रियेची गुणवत्ता वाढेल, अशी अपेक्षा परराष्ट्र खात्याने व्यक्त केली आहे. प्रक्रिया जलद होण्यासाठी परराष्ट्र खात्याने साऱ्याच पासपोर्ट अर्जदारांना डीजीलॉकर सेवेचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

पासपोर्ट क्रमवारीत सुधारणा

‘हेन्ली पासपोर्ट इंडेक्स’ या पासपोर्टची ताकद किंवा गुणवत्ता सांगणाऱ्या यंत्रणेने आता नवी क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये जगभरातील १९९ देशांच्या पासपोर्टचा समावेश आहे. अनेक देश एकाच क्रमवारीत असल्यामुळे, ही क्रमवारी १०९पर्यंत जाहीर झाली आहे. ‘हेन्ली पासपोर्ट इंडेक्स २०२३’नुसार भारताचा पासपोर्ट सेनेगल आणि टोगो या देशांसह ८५व्या स्थानावर आहे. भारतीय पासपोर्ट बाळगणाऱ्या व्यक्तीला ५७ देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवेश मिळू शकतो. नवीन रँकिंगनुसार पाकिस्तानचा पासपोर्ट जगातील खालून चौथ्या क्रमांकावर आहे. सन २०२२च्या क्रमवारीत पाकिस्तानच्या स्थानात कोणताही बदल झालेला नाही. गेल्या वर्षीही हा जगातील चौथा सर्वांत सुमार दर्जाचा पासपोर्ट होता. या वर्षी पाकिस्तानचे रँकिंग १०४ आहे. भारताच्या पासपोर्टची शक्ती वाढण्यासाठी देशाची आर्थिक आणि राजकीय शक्ती वाढणे महत्त्वाचे असते. पासपोर्ट मिळण्यासाठी उपलब्ध होणारी अत्याधुनिक तंत्रसुविधा ही एका प्रकारे पासपोर्टची ताकद वाढविणारीच आहे.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!