
नांदेड| सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित 62 वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी नांदेड येथे कुसुम सभागृहात संपन्न होत आहे. स्पर्धेच्या सहाव्या दिवशी क्रांती हुतात्मा चॅरिटेबल ट्रस्ट, परभणीच्या वतीने रविशंकर झिंगरे लिखित, विजय करभाजन दिग्दर्शित “गंमत असते नात्याची” या कोटुंबिक नाट्य प्रयोगाचे हाऊस फुल गर्दीत सादरीकरण झाले.
सध्या नवं युवकांमध्ये प्रचलित अश्या लिव्ह इन रिलेशनशिप विषयी हे नाटक भाष्य करते. रविशंकर झिंगरे यांनी आपल्या लेखणीला नेहमी पेक्षा या नाटकाच्या निमित्ताने वेगळे वळण दिले. गंभीर विषय इतक्या सहज, सुंदर पद्धतीने लेखकाने उतरवले आणि दिग्दर्शकाने ते सहज प्रेक्षकांसमोर मांडले. यात किशोर पुराणिक यांनी साकारलेली शरदची भूमिका आणि डॉ. अर्चना चिक्षे यांनी साकारलेली सुलभा ही लक्षवेधी ठरली यात वैभव उदास आणि मोनिका गंधर्व यांनी पत्रानुरूप भूमिका साकारल्या.
प्रसाद देशपांडे आणि किशोर विश्वामित्रे यांनी सूचक नेपथ्य साकारले तर प्रकाशयोजना – अमोल आंबेकर आणि शौनक पांडे, संगीत – सौरभ वडसकर आणि श्रीकांत काळे, रंगभूषा – संतोष चिक्षे आणि आयुषी चिक्षे, वेशभूषा – सुनीता करभाजन आणि मोहिनी गंधर्व, नृत्य दिग्दर्शन – संदीप राठोड आणि संजय कातनेश्वरकर रंगमंच व्यवस्था – राजलक्ष्मी देशपांडे, रेणुका अंबेकर, ऐश्वर्या पुराणिक, प्रमोद बल्लाळ, श्रीकांत कुलकर्णी आणि खालेद मामु यांनी सांभाळली.
एकंदर स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी हलके फुलके कोटुंबिक नाटक रसिक प्रेक्षकांना अनुभवता आले. उद्या दि २८ नोव्हेंबर रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस आर्ट्स, कॉमर्स अॅन्ड सायन्स कॉलेज, नांदेडच्या वतीने सुरेश खरे लिखित डॉ. मनीष देशपांडे दिग्दर्शित “मंतरलेली चैत्रवेल” या नाट्य प्रयोगाचे सादरीकरण होणार आहे.
