हिमायतनगर| येथील नगरपंचायतीचे शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगराध्यक्षावर चाकूने हल्ला केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली आहे. भाजपा युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्षाने हा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहर परिसरात खळबळ उडाली आहे. व्यक्तीक बदनामी केल्याच्या रागातून हा हल्ला झाली कि..? राजकीय वैमनस्यातून हे अद्याप अस्पष्ट आहे.
कुणाल राठोड हे हिमायतनगर येथील शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगराध्यक्ष आहेत. मंगळवारी रात्री आकरा वाजेच्या सुमारास ते आपल्या मित्रासोबत हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर मंदिर मंगल कार्यालया जवळ मित्रांसोबत बसले होते. काही वेळानंतर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष राम सूर्यवंशी हा देखील तिथे आला. अचानक सूर्यवंशी याने चाकूने कुणाल राठोड याच्या पायावर आणि हातावर वार केला. यामध्ये राठोड जखमी झाले असून, हिमायतनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. मात्र रक्तस्त्राव होतं असल्याने त्यांना नांदेडच्या एका खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. सद्या त्यांची प्रकृत धोक्याबाहेर असल्याची सांगितले जात आहे.
शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड आणि भाजयुमोचे माजी तालुकाध्यक्ष राम सूर्यवंशी यांच्यात मागील पाच वर्षा पासून वाद सुरु असल्याची माहिती आहे. वैयक्तिक बदनामी केल्याच्या संशयावरून हा प्रकार घडल्याच बोलल जातं आहे. दरम्यान या घटनेत राम सूर्यवंशी हे देखील जखमी झाले असल्याचे सांगितले जात असून, त्यांच्याशी संपर्क केला असता माझ्यावर देखील कुणाल राठोड यांनी चाकूने वार केला. आमच्या दोघात झटपट झाली यात मला चाकू लागला त्यामुळे नांदेडच्या रेणुकाची हॉस्पिटमलध्ये उपचार घेत असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. एकूणच या प्रकरणी वृत्त लिहीपर्यंत हिमायतनगर पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद झाली नव्हती.