नांदेड। मागील एक महिन्यापासून भोकर नगरपरिषदेची कचरा व्यवस्थापन यंत्रणा सक्षमपणे काम करीत नाही. तसेच भोकर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचे मुख्य चेंबर फुटल्याने मागील 7 दिवसांपासून नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. ही बाब अत्यंत गंभीर असून पिण्याचे पाणी व कचऱ्याचा प्रश्न तत्काळ मिटवा अशा सूचना माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी नगरपालिका मुख्याधिकारी यांना एका लेखी पत्राद्वारे केली आहे.
भोकर नगरपरिषदेकडून नियमितपणे कचरा उचलला जात नसल्याने शहरात ठिकठिकाणी अस्वच्छता व दुर्गंधी पसरली आहे. घंटागाडीमार्फत घराघरातील कचरा गोळा करण्याचे काम बंद पडले आहे. नगरपरिषदेचा घनकचरा डेपो नागरी वस्तीशेजारी असल्याने तेथील रहिवाशांचा सदर ठिकाणी कचरा डंप करण्यास विरोध होतो आहे. शहरात ठिकठिकाणी कचरा जमा झाल्याने मच्छर व माशांचा प्रादुर्भाव वाढला असून, नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
त्याचप्रमाणे भोकर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचे मुख्य चेंबर फुटल्याने मागील सात दिवसांपासून नागरिकांना पाणी मिळत नाही. शहराला टँकरने पाणीपुरवठा सुरु असला तरी ती व्यवस्था पुरेशी नाही. शिवाय फुटलेल्या चेंबरच्या दुरुस्तीचे कामही वेगाने होत नसल्याचे मत व्यक्त केले जाते आहे.
वरील दोन्ही मुद्द्यांच्या पार्श्वभूमिवर भोकर शहरातील नागरिकात रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे आपण या दोन्ही समस्यांमध्ये तातडीने लक्ष घालून त्याचे त्वरेने निवारण करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत, अशी सूचना माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी नगर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना केली आहे.