नांदेड| खोट्याला प्रतिष्ठा, मध्ययुगीन हिंसेकडे वाटचाल, कार्पोरेट भांडवलशाही, उन्मादी हिंसक धुमाकूळ यातून देश अस्थिर. केला जात आहे भूक, भय,भ्रम आणि भेद या शस्त्रांचा वापर करून लोक कल्याणकारी लोकशाही आणि त्याची हमी देणारे संविधान धोक्यात आणले जात आहे. म्हणून भक्षक विकासाच्या भुलभुलय्याला बळी न पडता भारतीय नागरिकांनी लोकशाही आणि संविधान रक्षणाची लढाई लढावी, असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन (पनवेल) यांनी केले.
कल्चरल असोसिएशन नांदेडच्या वतीने कुसुम सभागृहात आयोजित एकविसाव्या फुले- शाहू- आंबेडकर- अण्णा भाऊ साठे व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या. त्यांच्या व्याख्यानाचा विषय “2024 -संविधानाचे राज्य असेल का?” असा होता. अध्यक्षस्थानी जिल्हा कोषागार अधिकारी ज्योती बगाटे- कश्यप ह्या होत्या. तर विमल नवसागरे या यावेळी मंचावर उपस्थित होत्या.
उल्का महाजन पुढे म्हणाल्या, आज देशात जातीव्यवस्था तिच्या उतरंडीसह कायम करण्याकडे वाटचाल सुरू आहे. अदानी, अंबानीच्या बड्या कार्पोरेटाच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या भविष्याशी सौदा करणारे कायदे आणले जात आहेत. कामगारांचे कायदे संपून जुलमी संहिता लादण्यात येत आहेत. दारिद्रय रेषेचे मापन बंद करण्यात आले आहे. काम कमी आणि जाहिराती जास्त, अशी संस्कृती निर्माण करण्यात आली आहे. ही संस्कृती भारतीय नाही. आपल्या संतांनी दिलेली ही दिशा नाही. महात्मा गांधीजींच्या कल्पनेतील हे रामराज्य नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या वाटेवरील हा प्रवास नाही. ही पीछेहाट आहे. ही पीछेहाट व लोकशाहीचे खच्चीकरण थांबवण्यासाठी संविधानाने दिलेली जबाबदारी निष्ठेने पाळण्याची वेळ आली आहे, असेही त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय समारोप करताना ज्योती बगाटे म्हणाल्या की, संविधानाचा गौरव करताना त्यातील तरतुदींचा लाभ गरजूपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नांची आवश्यकता आहे. सामाजिक दुःखाची कारणे सत्तेपेक्षा व्यवस्थेत अधिक आहेत. सत्ता बदलाचा आग्रह धरताना, व्यवस्था परिवर्तनासाठी दिशा आखणे गरजेचे आहे.
प्रारंभी म.फुले,राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पिंपळाच्या रोपट्यास पाणी घालून व्याख्यानमालेचे उद्घाटन करण्यात आले. पाहुण्यांचा परिचय आणि प्रास्ताविक डॉ. शीतल गोणारकर यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे आभार प्रदर्शन डॉ.मंदाकिनी माहूर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.राजेंद्र गोणारकर, डॉ. विजयकुमार माहुरे, मारोतराव धतुरे, रामदास होटकर, इंजि. डी. डी. भालेराव, इंजि.अनिल लोणे, शंकरराव शिरसे, प्रा. पंडित सोनाळे, डॉ.गजानन ढोले, विमल शेंडे आदींनी परिश्रम घेतले.