हिमायतनगर, अनिल मादसवार| “होऊ द्या चर्चा या अभियानातून मोदी सरकारने निवडणुकीच्या काळात जनतेला दिलेली आश्वासनं फोल ठरली आहेत. त्याच्या खोट्या आश्वासनांचा जाब विचारण्यासाठी हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदार संघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने होऊ द्या चर्चा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. निवडणुका घेण्यास घाबरत असलेल्या भाजप, शिंदे आणि पवार या टिबल इंजिनच्या सरकारला त्यांची जागा दाखविण्यासाठी शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य नागरिकांनी जागा व्हाव असं आवाहन आयोध्याताई पौळ यांनी केले.
ते हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिर मैदानात आयोजित करण्यात आलेल्या “होऊ द्या चर्चा या अभियानाच्या मंचावरून बोलत होत्या. यावेळी मंचावर कृष्णा पाटील आष्टीकर यांच्यासह हदगाव हिमायतनगर तालुक्यातील मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते. या अभियानाच्या माध्यमातून काळा पैसा भारतात आला का, १५ लाख रुपये बँक खात्यात आले का, सर्वांना पक्की घरे मिळाली का, बेरोजगारांना नोकरी मिळाली का, पेट्रोल-डिझेलचे भाव कमी झाले का, नवीन उद्योगधंदे आले का, महागाई कमी झाली का, घरगुती गॅसवरील सबसिडी बंद का केली यासह सर्व बोलघेवड्या योजनांचा जाब विचारत ‘होऊ द्या चर्चा’ अभियानांतर्गत ठाकरे गटाकडून नागरिकांमध्ये जनजागृती करून सरकारच्या खोट्या आश्वासनांचा बुरखा फाडला जात आहे.
सध्याच्या प्रशासकीय राजवटीमुळे नागरिक त्रस्त आहेत. हजारो शेतकऱ्यांना हक्काचा पीक विमा मिळत नाही, नुकसानीची भरपाई मिळत नाही. रुग्णालयात सुविधा मिळत नसल्याने नांदेडमध्ये ४१ जणांचा जीव गेला. या सर्व प्रकारचा आक्रोश येणाऱ्या निवडणुकीत मतदान पेटीतून व्यक्त होण्याची जाणीव असल्यामुळेच निवडणुका घेण्यास शासन घाबरत आहे. त्यामुळे आम्हाला केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनांची नागरिकांना आठवण करून देण्यासाठी अभियान राबवावा लागत आहे. आपण आटा नाही बोललो तर पुन्हा बोलण्याची संधी देखील मिळणार नाही. सरकारच्या विरोधात बोलणार्यावर कार्यवाही केली जाते. असा आरोप उपस्थित मंचावरील मान्यवरांनी आपल्या भाषणातून केला. या होऊ द्या चर्चा अभियानास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. मोदी सरकारने निवडणुकीच्या काळात जनतेला दिलेली आश्वासनाचा जाब विचारत ‘होऊ द्या चर्चा’ अभियानांतर्गत ठाकरे गटाकडून नागरिकांमध्ये पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात येत आहे.