प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री परमेश्वर मंदिरात भव्य संगीतमय रामकथेला 16 जानेवारीपासून होणार सुरुवात
हिमायतनगर, परमेश्वर काळे| 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या शहरात भगवान श्री रामचंद्रांच्या बाल मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. त्यानिमित्ताने नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री परमेश्वर मंदिर देवस्थान समितीच्या वतीने भव्य संगीतमय रामकथेचे आयोजन करण्यात आले आहे. सात दिवसीय संगीतमय श्री राम कथा कार्यक्रमात हरिभक्त पारायण आचार्य बालयोगी स्वामी गजेंद्र चैतन्यजी महाराज, शांतीधाम आश्रम माधापुरी, जिल्हा अकोला यांच्या मधुर वाणीतून रामायण कथा भक्तांना झाकीच्या माध्यमातून सांगितली जाणार आहे.
भव्य रामायण कथा कार्यक्रमाला दि. 16 जानेवारीपासून सुरूवाट होणार असून, दररोज दुपारी 1 ते 4 वाजेपर्यंत कथा सांगितली जाणार आहे. सोमवार 22 जानेवारी रोजी अयोध्येत भगवान श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर श्री परमेश्वर मंदिर समितीतर्फे सर्व भाविकांच्या सहकार्याने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या धार्मिक व भक्तिमय कार्यक्रमाच्या निमित्ताने मंदिर परिसरात 5000 दिवे प्रज्वलित करून आणि आकर्षक विद्युत रोषणाई करून 21 जानेवारी पासून दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. अशी माहिती मंदिर समितीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांनी न्यूजफ्लॅश ३६०डॉटइनशी बोलताना दिली आहे. तसेच पंचक्रोशीत राहणाऱ्या सर्व भाविकांनी या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी व प्रसादाचा लाभ घ्यावाअसे आवाहनही केले आहे.