नांदेड। जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आश्रम शाळातील विद्यार्थ्यांमधून राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक निर्माण करणारे खेळाडू घडावेत, अशी अपेक्षा इतर मागास बहुजन कल्याण (प्रादेशिक) विभाग लातूरचे प्रादेशिक उपसंचालक दिलीपकुमार राठोड यांनी व्यक्त केली. सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण नांदेड व सर्व संस्था प्रमुख प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा (विजाभज) जिल्हा नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा-2024 च्या उद्घाटन प्रसंगी ग्रामीण टेक्निकल अँडमॅनेजमेंट कॅम्पस विष्णुपुरी नांदेड येथे ते बोलत होते.
विद्यार्थ्यात नेतृत्वगुण विकसित करीत, शारीरिक सौष्ठत्व व सांघिक भावनेचा विकास होऊन देशासाठी व राज्यासाठी सर्वार्थाने विकसित खेळाडू निर्माण करण्यात जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा पूरक ठरतील असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. हरणे आणि जिंकणे या खेळाच्या दोन बाजू असतात, विद्यार्थ्यांनी हरण्याची भीती न बाळगता उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करावे, असे आवाहन प्रादेशिक उपसंचालक दिलीपकुमार राठोड यांनी केले. या स्पर्धांमध्ये जिल्ह्याच्या 91 आश्रम शाळेतील जवळपास 540 स्पर्धकांनी खो-खो, कबड्डी व व्हॉलीबॉल स्पर्धामध्ये सहभाग घेतला आहे.
प्रसंगी सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण नांदेडचे शिवानंद मिनगीरे म्हणाले नांदेड जिल्ह्याच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना खेळाची प्रेरणा मिळावी, विद्यार्थ्यांची बुद्धी तल्लख व्हावी व त्यांच्यात नेतृत्वगुण विकसित व्हावे यासाठी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा प्रभावी माध्यम ठरतात. विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व समजून, जीवनात लढण्याची ऊर्जा मिळावी व आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्तम व्यासपीठ आहे, असे मत मांडले. क्रीडा स्पर्धात जिद्दीने प्रयत्न केल्यास या विद्यार्थ्यांना ऑलिंपिक्स पर्यंत मजल मारता येईल. स्वतःच्या नावासोबतच, आई-वडील आणि राज्याचे स्वप्न देखील पूर्ण करता येतील त्यासाठी विद्यार्थ्यांनी मोबाईल विश्वातून बाहेर पडत विविध खेळातून सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
प्रसंगी सचिव डॉ. विजय पवार यांनी शालेय विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेतच प्रकृती स्वास्थ्यासाठी गुंतवणूक करावी असा सल्ला दिला. ग्रामीण संस्था आयईडीएसएसए क्रीडा स्पर्धामध्ये मागील पाच वर्षांपासून जनरल चॅम्पियनशिप मिळवीत असल्याचे आवर्जून सांगितले. विविध क्रीडा स्पर्धांमध्ये गुण दर्शविण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना प्लॅटफॉर्म मिळावे, असे मत मांडले. नांदेड जिल्ह्याचे सहायक क्रीडा अधिकारी संजय बेतीवार यांनी खेळाडूंना शासनातर्फे मिळणाऱ्या सुविधांबद्दल मार्गदर्शन केले. क्रीडा स्पर्धांसाठी अनेक शाळांच्या मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. स्पर्धांच्या यशस्वीतेसाठी इतर मागास बहुजन कल्याण नांदेडचे समाज कल्याण निरीक्षक व आश्रमशाळेतील शिक्षक, संस्थां मधील सर्व कर्मचारी यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. सूत्रसंचालन डॉ. ओमप्रकाश दरक यांनी तर आभार सहशिक्षक एम. एम. कांबळे यांनी मानले.