नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत परीक्षेत्रातील चारही जिल्ह्यामधील पदवी परीक्षेला आज दि.०२ एप्रिल पासून सुरुवात होत आहे. एकूण १०१ परीक्षा केंद्रावर ०१ लाख ४ हजार ६१६ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

बी. ए., बी.कॉम., बी.एस्सी. आणि आंतरविद्याशाखा यामधील एकूण ३५ अभ्यासक्रमाच्या परीक्षा दि. २ ते ३० एप्रिल दरम्यान होणार आहेत. या परीक्षा सुरळीत होण्यासाठी तथा कॉपीमुक्त होण्यासाठी विद्यापीठाकडून ५२ भरारी पथकांची नेमणूक करण्यात आलेली आहे.

याशिवाय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर सर हे पण अचानकपणे चारही जिल्ह्यातील कोणत्याही परीक्षा केंद्रास भेट देणार आहेत. या दरम्यान परीक्षा केंद्रावर कॉपी अथवा असुविधा आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी कळविले आहे.

परिक्षेत्रातील नांदेड, परभणी, हिंगोली व लातूर या जिल्ह्यामध्ये पदवी परीक्षेदरम्यान कोणतेही नियमबाह्य कार्य होऊ नये याबद्दलची काळजी संबंधित परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षकांनी घ्यावी व संस्थेने सहकार्य करावे, शिवाय विद्यार्थ्यांनी कॉपीमुक्त व भयमुक्त परीक्षा द्यावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक हुशारसिंग साबळे यांनी केले आहे.
