नांदेड| प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम 2023-24 मध्ये एक रुपयामध्ये पिक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पिक विमा उतरविण्याची अंतिम मुदत ज्वारी जि. पिकासाठी 30 नोव्हेंबर 2023 असून गहू बा. व हरभरा पिकासाठी 15 डिसेंबर आहे. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी किंवा जवळच्या बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. पिक पेरणीतून काढणीपर्यतचा कालावधी नैसर्गिक आग, वीज, कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड इ. बाबीमुळे पिकांच्या उत्पादनात येणारी घट काढणीपश्चात नुकसान इ. जोखीम यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यातील गहु बा, ज्वारी (जि), हरभरा या पिकांसाठी ही योजना लागू आहे.
या योजनेअंतर्गत पिक, विमा संरक्षित रक्कम व विमा हप्ता, विमा लागू असलेले तालुके, पिक विमा भरण्याचा अंतिम दिनांक पुढीलप्रमाणे आहे. गहू बा. पिकासाठी हेक्टरी 42 हजार 500 विमा संरक्षित रक्कम रुपये असून विमा हप्ता रु. 1 आहे. नांदेड, अर्धापूर, मुदखेड, बिलोली, लोहा, कंधार, नायगाव, धर्माबाद, किनवट, हिमायतनगर, भोकर, हदगाव या तालुक्यासाठी लागू असून विमा भरण्याची अंतिम मुदत 15 डिसेंबर आहे.
ज्वारी जि. पिकासाठी 33 हजार 750 विमा संरक्षण असून 1 रुपयात नांदेड, देगलूर, नायगाव, बिलोली, मुखेड, धर्माबाद, किनवट, हदगाव या तालुक्यातील शेतकऱ्यांना 30 नोव्हेंबर 2023 पर्यत विमा भरता येणार आहे. हरभरा पिकासाठी 37 हजार 500 विमा संरक्षित रक्कम असून नांदेड, अर्धापूर, मुदखेड, बिलोली, लोहा, कंधार, नायगाव, धर्माबाद, मुखेड, किनवट, माहूर, हिमायतनगर, भोकर, हदगाव, उमरी या तालुक्यातील शेतकऱ्यांना 15 डिसेंबर 2023 पर्यत 1 रुपयात विमा भरता येणार आहे, असे कृषी अधीक्षक कृषी कार्यालयाने कळविले आहे.