नांदेड/हिंगोली। वक्तृत्व स्पर्धा म्हणजे शाळेतील उपक्रम नव्हे, ही स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी एक स्वतंत्र व्यासपीठ तयार करुन देत असते. वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भाषणातून समृद्धपणा, अकलन क्षमते सोबतच त्यांच्यातील निरिक्षण क्षमता वाढते हे या स्पर्धेचे सर्वात मोठे यश आहे असे वक्तव्य राजश्री हेमंत पाटील यांनी येथे व्यक्त केले.
हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कयाधू-पैनगंगा महोत्सव समिती अंतर्गत विधानसभा स्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार १८ ते २३ डिसेंबर २०२३ दरम्यान आयोजित करण्यात आलेली भव्य वक्तृत्व स्पर्धेची सुरुवात सोमवारी (दि.१८) वसमत विधानसभा क्षेत्रापासून करण्यात आली. ही स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली.
खासदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मागील वर्षापासून हिंगोली लोकसभा मतदारसंघात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना दिल्ली येथील देशाचे सर्वोच्च सदन संसद व राष्ट्रपती भवन भेट आणि इतर महत्वाच्या शैक्षणिक संस्था दाखविण्यात आल्या होत्या. यंदाही अश्याच प्रकारच्या दिल्ली अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
मागील वर्षी मिळालेल्या प्रचंड प्रतिसादा नंतर यंदाही वसमत येथून या स्पर्धेची सुरवात करण्यात आली. या कार्यक्रमास गोदावरी समुहाच्या अध्यक्षा राजश्री हेमंत पाटील, वसमत शिवसेना तालुकाप्रमुख राजु चापके, प्रा. बी. डी. कदम, रामकृष्ण झुंझुरडे, प्रभाकर क्षिरसागर, मुख्याध्यापिका सरिता पतंगे, मच्छिंद्र सोळंके, प्रमोद भुसारे यांची उपस्थिती होती.
या वक्तृत्व स्पर्धेसाठी संत नामदेव : भारत जोडणारा दुवा, स्व. बाळासाहेब ठाकरे आणि स्व.आनंद दिघे साहेबांचे विचार जपणारा लोकनेता : एकनाथरावजी शिंदे साहेब, संस्कारक्षम युवक काळाची गरज, बदलती वाचन संस्कृती बुक ते ई-बुक, हिंगोली लोकसभा मतदारसंघ विकासासाठीचा दीपस्तंभ : हळद संशोधन केंद्र आणि लिगो प्रकल्प, समाजभान जपणारा नेता: खासदार हेमंत पाटील साहेब आणि समृद्ध शेतीची गुरुकिल्ली संशोधन आणि जलसिंचन असे ७ विषय ठेवण्यात आले आहेत. या स्पर्धेत १६ ते २८ वयोगटातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन विचार मांडले.
यासाठी त्यांना किमान ५ आणि जास्तीत जास्त ७ मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. या स्पर्धेत भागवत चव्हाण (प्रथम), समिक्षा चोपडे (व्दितीय), प्रिती जाधव (तृतीय), तेजस्वीनी बुचाले (उत्तेजनार्थ -१), अखिलेश निगडकर (उत्तेजनार्थ-२) विजयी घोषीत करण्यात आले.
तसेच या व इतर सहभागी स्पर्धकांना गोदावरी समुहाच्या अध्यक्ष राजश्री हेमंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. या स्पर्धेसाठी महेश अचिंतलवार, राजाभाऊ कदम, गोविंद अंभोरे यांनी परिक्षण केले. आशिष साडेगावकर यांनी सूत्रसंचालन केले, स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रपाल सरोदे, चक्रधर खराटे, आकाश शिंदे, परमानंद खराटे, मारुती जाधव यांनी परिश्रम घेतले.