इयत्ता दहावी परीक्षेचे आजपासून आयोजन; शिक्षण मंडळाकडून विविध सूचना निर्गमीत

By
NewsFlash360 Staff
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या,...
11 Min Read
Disclosure: This website may contain affiliate links, which means I may earn a commission if you click on the link and make a purchase. I only recommend products or services that I personally use and believe will add value to my readers. Your support is appreciated!

नांदेड,अनिल मादसवार| महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च 2024 मध्ये घेण्यात येणारी माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इयत्ता 10 वी ची लेखी परीक्षा शुक्रवार 1 मार्च 2024 ते मंगळवार 26 मार्च 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.

या परीक्षेसाठी एकुण 16 लाख 9 हजार 445 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यामध्ये 8 लाख 59 हजार 478 विद्यार्थी तर 7 लाख 49 हजार 911 विद्यार्थीनी आहेत व 56 Trans Gender आहेत. एकूण 23 हजार 272 माध्यमिक शाळांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली असून या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्यार्थ्यांसाठी 5 हजार 86 मुख्य केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे.

परीक्षेची ठळक वैशिष्टये
मार्च 2024 च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन स्विकारण्यात आलेली असून सरल डेटावरुन माध्यमिक शाळांची माहिती घेऊन आवेदनपत्रे ऑनलाईन भरलेली आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी दिनांक 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत ऑनलाईन आवेदनपत्रे स्विकारण्यात आलेली आहेत.

विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने मार्च 2024 च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेचे वेळापत्रक तयार करण्यात आले असून परीक्षेदरम्यान महत्वाच्या बहुतांश विषयांच्या पेपरमध्ये खंड ठेवण्यात आला आहे. मंडळामार्फत प्रसिद्ध व छपाई केलेले वेळापत्रकच ग्राह्य धरावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये. मार्च 2024 च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेचे वेळापत्रक गुरूवार दि. 2 नोव्हेंबर 2023 रोजी मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर केले आहे.

परीक्षांच्या कालावधीत अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भितीने मानसिक दडपणाखाली असतात अशा विद्यार्थ्यांना नैराश्येतून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी राज्य मंडळ स्तरावरून समुपदेशन करण्यासाठी 10 समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी विभागीय स्तरावर मंडळामध्ये जिल्हानिहाय प्रत्येकी दोन याप्रमाणे समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच राज्यमंडळ व 9 विभागीय मंडळात नियंत्रण कक्ष कार्यरत करून हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.

या परीक्षेसाठी नियुक्त केलेले सहाय्यक परिरक्षक (रनर) परीक्षा कालावधीत बैठे पथक म्हणून मुख्य केंद्रावर कार्यरत राहणार आहेत. तसेच त्यांनी परिरक्षण केंद्रावरून गोपनीय पाकिटे ताब्यात घेतल्यापासून ते परीक्षा केंद्रावर पोहोचेपर्यंत व वितरीत करेपर्यंतचे चित्रीकरण मोबाईलमध्ये करण्याबाबतच्या सूचना संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत. प्रश्नपत्रिकेची गोपनीयता अबाधित राहण्यासाठी मुख्य परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहोच करण्याकरीता व उत्तरपत्रिका आणण्याकरीता नियुक्त करण्यात आलेल्या सहाय्यक परिरक्षक (रनर) यांनी जीपीएस प्रणाली सुरू ठेवणे आवश्यक करण्यात आलेले आहे.

सर्व परीक्षार्थ्यांना परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी किमान अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर पोहोचण्याच्या सूचना सर्व माध्यमिक शाळांमार्फत परीक्षार्थ्यांना देण्यात आलेल्या आहेत. तसेच परीक्षार्थ्यांना देण्यात आलेल्या प्रवेशपत्रातही (Hall Ticket) नमूद करण्यात आलेले आहे. सकाळ सत्रात स. 10.30 वाजता व दुपार सत्रात दु. 2.30 वाजता परीक्षार्थ्याने परीक्षा दालनात उपस्थित राहणे आवश्यक आहे. सकाळ सत्रात स. 11 वाजता तसेच दुपार सत्रात दु. 3 वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येईल. गतवर्षीप्रमाणेच मार्च 2024 परीक्षेसाठी पेपरच्या निर्धारित वेळेनंतर शेवटी दहा मिनिटे वाढवून देण्यात आलेली आहेत.

लेखी परीक्षेपूर्वी गैरमार्ग प्रकरणी विद्यार्थ्यांसमोर शिक्षासूचीचे तसेच उत्तरपत्रिकेच्या मुखपृष्ठाच्या मागील बाजूस असलेल्या सूचनांचे वाचन करणेबाबत सर्व माध्यमिक शाळांना विभागीय मंडळामार्फत सूचित करण्यात आलेले आहे. परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना दिनांक 16 ऑक्टोंबर 2018 रोजीच्या शासन निर्णयानुसार प्रचलित पद्धतीप्रमाणे अनुज्ञेय असलेल्या सवलती देण्यात आलेल्या आहेत. त्यासाठी संबंधितांनी विभागीय मंडळाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.

संपूर्ण राज्यासाठी एक नियोजनबध्द व सर्व घटक समावेशक असा ‘गैरमार्गाशी लढा’ या अभियानाचा कृति कार्यक्रम या वर्षी देखील मंडळाने राबविण्याबाबत सर्व संबंधितांना सूचना दिलेल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात एकसूत्रीपणा हे तत्व विचारात घेवून याबाबत नियोजन करण्यात आले आहे व त्यानुसार स्थानिक दक्षता समिती व केंद्रस्तर सभा, पालकसभा, विद्यार्थ्यांचे उद्बोधन, इत्यादीद्वारे या अभियानाचा कृति कार्यक्रम संपूर्ण राज्यभर राबविण्याबाबत कळविण्यात आलेले आहे. त्यामुळे परीक्षेशी संबंधित घटकांच्या विशिष्ट वैचारिक मनोवृत्तीमध्ये सकारात्मक बदल होण्यास व परीक्षेतील गैरप्रकार कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.

परीक्षा काळातील संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा यादृष्टीने मंडळामार्फत संपूर्ण राज्यात 271 भरारी पथके नेमण्यात आली आहेत. याशिवाय प्रत्येक जिल्हयामध्ये जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती कार्यरत असून काही विभागीय मंडळात विशेष भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. तसेच विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना परीक्षा केंद्रांना भेटी देण्याबाबत मंडळाकडून विनंती करण्यात आली आहे. तसेच मंडळ सदस्य आणि शासकीय अधिकारी यांना परीक्षा केंद्राना आकस्मिक भेटी देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच प्रात्यक्षिक परीक्षा सुरळीत व सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक व योजना), सर्व गटशिक्षणाधिकारी तसेच शिक्षण विस्तार अधिकारी यांना प्रात्यक्षिक परीक्षा काळात कमीत कमी 10 माध्यमिक शाळांना भेटी देणेबाबत सूचित करण्यात आले आहे.

सर्व विभागीय आयुक्तांना तसेच जिल्हाधिकारी यांना अर्धशासकीय पत्र पाठवून शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी व अधिक जबाबदार भावी पिढी निर्माण व्हावी याकरीता व परीक्षा पद्धतीवरील विश्वास व आदर वृध्दींगत होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांच्या मदतीने ‘गैरमार्गाविरूध्द लढा’ हे अभियान यशस्वी करण्यासाठी आवाहन केले आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना राज्यामध्ये कॉपीमुक्त अभियान राबविणेबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत.

केंद्रसंचालक, उपकेंद्रसंचालक व परिरक्षक यांच्या विभागीय मंडळ स्तरावर बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. राज्य मंडळ कार्यालयामार्फत सर्व विभागीय मंडळ अध्यक्ष, विभागीय सचिव, इतर अधिकारी यांच्यासह शिक्षण सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक, योजना) व प्राचार्य, जिल्हा संशोधन व प्रशिक्षण संस्था यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक आयोजित करून परीक्षा नियोजन व इतर बाबींसंदर्भात सूचना देण्यात आलेल्या आहेत. राज्यमंडळामार्फत सर्व विभागीय मंडळाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या वेळोवेळी बैठका घेऊन कामकाजाचा आढावा घेतलेला आहे.

मंडळाने निर्धारित केलेल्या कालावधीत विद्यार्थी वैद्यकीय/अपरिहार्य कारणांमुळे प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन देऊ न शकल्यास अशा विद्यार्थ्यांची सदर परीक्षा लेखी परीक्षेनंतर 27 ते 30 मार्च 2024 या कालावधीत Out of Turn ने आयोजित करण्यात आलेली आहे. मार्च 2024 च्या परीक्षेपासून प्रथमच प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत (Practical & Internal), श्रेणी इत्यादी परीक्षांचे ऑनलाईन पद्धतीने गुण भरून घेण्यात येणार आहेत. याबाबतची लिंक व सविस्तर सूचना विभागीय मंडळामार्फत सर्व माध्यमिक शाळांना देण्यात आलेल्या आहेत.

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इयत्ता 10 वी परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका देताना एका वर्गासाठी 25 प्रश्नपत्रिकांचे स्वतंत्र सिलबंद पाकिट याप्रमाणे पाकिटे देण्यात येणार आहेत. 25 प्रश्नपत्रिकांचे सिलबंद पाकिट पर्यवेक्षक आपल्या परीक्षा कक्षातील दोन परीक्षार्थ्यांची स्वाक्षरी घेवून व तद्नंतर स्वतःची स्वाक्षरी करून उघडतील. त्याचे यादृच्छिकपणे (Randomly) चित्रीकरण रनर मार्फत करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे प्रश्नपत्रिकांची गोपनीयता राखण्यास आणखी मदत होणार आहे. विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व शाळांना ऑनलाईन प्रवेशपत्र (हॉल तिकीट) देण्यात आलेली आहेत. सदर प्रवेशपत्रावर मराठी व इंग्रजीतून सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच प्रवेशपत्रावर विषयासमोर दिनांक व परीक्षा कक्षात उपस्थित राहण्याची वेळ याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. परीक्षांच्या कालावधीत गैरमार्गास आळा घालण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या भरारी पथकांच्या भेटीचे नियोजन विभागीय मंडळ स्तरावरून करण्यात येणार असून ज्या त्या पेपरच्या दिवशी सकाळी संबंधित भरारी पथकांना नियोजन देण्यात येईल.

वरील बाबी वेळोवेळी सर्व माध्यमिक शाळांमार्फत विद्यार्थ्यांना कळविण्यासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित माध्यमिक शाळांशी संपर्क साधावा. विद्यार्थ्यांनी कोणत्याही गैरप्रकारांच्या प्रलोभनांना बळी पडू नये. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रवेशपत्र (हॉलतिकीट) व उत्तरपत्रिकेवरील सूचनांचे काळजीपूर्वक वाचन व पालन करावे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जावू नये म्हणून सन 2016-17 या शैक्षणिक वर्षापासून माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इयत्ता 10 वी मुख्य परीक्षेनंतरची पुरवणी परीक्षा सर्वसाधारणपणे जुलै-ऑगस्ट मध्ये आयोजित करण्यात येत आहे.

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) मार्च 2019 परीक्षेपासून अनिवार्य विषय गटात द्वितीय भाषा व सामाजिक शास्त्रे विषयास पर्याय म्हणून NSQF अंतर्गत विषय कोड X-1 ते X-4, X-6 ते X-9, 95 ते 98 तसेच व्यवसाय शिक्षण संचालनालय अंतर्गत X-1, 91 ते 93 या विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे. शैक्षणिक वर्ष 2023-2024 पासून NSQF अंतर्गत विषय कोड क्र. 94 व 99 या दोन नवीन विषयांचा समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात काही अडचणी असल्यास विभागीय मंडळाच्या हेल्पलाईनद्वारे मार्गदर्शन मिळण्यासाठी पुढीलप्रमाणे हेल्पलाईन क्रमांक दिलेले आहेत.

विभागीय मंडळनिहाय-हेल्पलाइन दूरध्वनी क्रमांक
विभागीय मंडळ पुणे दूरध्वनी/मोबाईल क्रमांक : मो.क्र. 7038752972, 9420214135, 9763697632, याप्रमाणे नागपूर विभागीय मंडळ : मो.क्र. 9822692103, 8830458109, 9673163521, 8308007613. छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळ : 0240-2334228, मो. 8275043113, 7588912194. मुंबई विभागीय मंडळ : 022-27881075, 022-27893756, मो. 9869489606, 8779062029. कोल्हापूर विभागीय मंडळ : 0231-2696101, 0231-2696102, 0231-2696103, मो. 9834004484, 9890772229, 9422627511. अमरावती विभागीय मंडळ : 0721-2662647, मो. 7057554432, 9890371073, 9834726328, 8080850584, 9421258116. नाशिक विभागीय मंडळ : 0253-2945251, 0253-2945155, मो. 8888339423, 9921390613, 9423692639, 9322293183, लातूर विभागीय मंडळ : 02382-251633, मो. 9405077991, 9421735683, 8830298158, 7620166354. कोकण कोल्हापूर विभागीय मंडळ : 02352-228480, 02352-231250, मो.क्र. 9673080077, 9049420215, 9423009167 हे दूरध्वनी व मोबाईल क्रमांक मंडळाने दिले आहेत. तसेच राज्य मंडळ स्तरावरही हेल्पलाईन सुरू करण्यात आली असून त्याचे दूरध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. 020-25705271, 020-25705272 असून परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शिक्षण मंडळाने हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

नांदेड जिल्ह्यात ड्रोन कॅमेऱ्यासह मानवनिर्मित वस्तू उडविण्यास प्रतिबंध
नांदेड जिल्ह्यात व श्री गुरु गोविंदसिंघजी विमानतळाच्या 10 कि.मी परिघ क्षेत्रात 3 ते 4 मार्च 2024 या कालावधीत ड्रोन उडवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मधील कलम 144 (1) नुसार ड्रोन कॅमेरा, ड्रोन सदृश्य वस्तु व हवेत उडविल्या जाणाऱ्या मानवनिर्मित वस्तू उडविण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रतिबंध केले आहे. अतिमहत्वाच्या व्यक्तीच्या हवाई वाहतुकीची शक्यता आहे. त्यांच्या सुरक्षेच्यादृष्टिने जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी याबाबतचा आदेश 29 फेब्रुवारी 2024 रोजी निर्गमीत केला आहे.

Share This Article
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!