हिमायतनगर,परमेश्वर काळे | ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली होती. त्या पडझड झालेल्या घरांचे सर्वेक्षण झाले होते. परंतु एका वर्षापासून लाभार्थ्यांना घरपडीचे अनुदान काही प्रशासकीय कारणामुळे तहसील कार्यालयात पडून होते. वाटप करण्यास टाळाटाळ होत होती. आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी बैठक घेऊन तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांना अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या सूचना दिल्यानंतर पहिला टप्पा गुरूवारी जमा झाला आहे.
हिमायतनगर तालुक्यात गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे गोरगरिबांची कच्ची घरे ढासळली तर पक्के घराच्या भिंती तडकल्या त्यामुळे अनेकांना घर सोडून रहावे लागले होते. त्या परिस्थिती मध्ये पडझड झालेल्या घरांचे सर्वेक्षण करण्यासाठी प्रशासनाने आदेश दिले होते. त्यानंतर पडझड झालेल्या घरांचे अनुदान मिळणार या आशेवर लाभार्थी होते.
सर्वे होऊन एक वर्षे उलटले तरी देखील लाभार्थ्यांना अनुदान मिळाले नाही आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून तालुक्यातील लाभार्थ्यांना घरपडीचे अनुदान देण्याची मागणी केली होती. त्यानंतर अनुदान तहसील कार्यालयाकडे जमा झाले होते परंतु वाटप करण्यास शासकीय यंत्रणेला अडचण होत असल्याने विलंब लागत होता. आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी दि. 20 नोव्हेंबर रोजी तहसीलदार गायकवाड, गटविकास अधिकारी मांजरमकर यांच्यासस प्रशाकीय यंत्रणेची बैठक बोलावून या बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना ठणकावून घरपडीचे अनुदान दोन दिवसात जमा झाले पाहिजे अशा सुचना दिल्या होत्या.
त्या बैठकीनंतर दि. 22 नोव्हेंबर पासून घरपडीच्या अनुदानाचा पहिला टप्पा प्रत्येकी सहा हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. दुसरा टप्पा देखील जमा करणे सुरू असुन तिसऱ्या टप्प्यातील लाभार्थ्यांना तहसील कार्यालयात अनुदान प्राप्त होताच त्या टप्प्यातील लाभार्थ्यांना घरपडीचे अनुदान मिळणार असल्याची माहिती तहसील कार्यालयातून मिळाली आहे. आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या कार्य तत्परतेने एका वर्षापासून थांबलेले घरपडीचे अनुदान वाटप सुरू झाले असल्याने लाभार्थ्यांत आनंद निर्माण झाला आहे. तहसीलदार गायकवाड, गटविकास अधिकारी सुधिश मांजरमकर, तहसील चे गडमवार ,पंचायत विभागाचे विशाल पवार, मझहर,यांच्याकडून काम सुरू आहे.