नांदेडसोशल वर्क

Nanded bus stand to be shifted : रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नांदेडचे बसस्थानक 12 एप्रिल पासून कौठा मैदानावर स्थलांतरीत होणार

नांदेड| जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नांदेड मध्यवर्ती बसस्थानकाच्या रस्त्याच्या मार्ग निकाली काढला असून आता रस्त्याचे काम करण्यासाठी बसस्थानक तात्पुरत्या स्वरुपात कौठा मैदानावर स्थलांतरीत होणार आहे. या नव्या निर्णयानुसार 12 एप्रिल पासून जुने बसस्थानक रस्त्यासाठी बंद करण्यात येणार आहे. नागरिकांनी या निर्णयासाठी सहकार्य करावे व संबंधित यंत्रणेने ठरलेल्या वेळेच्या आधी रस्त्याचे काम पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

नांदेड रेल्वेस्थानक ते मध्यवर्ती बसस्थानक हा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक बैठकांमध्ये वेगवेगळ्या स्तरातील शिष्टमंडळाने याबाबत तक्रारी केल्या होत्या. हा निर्णय बराच काळाचा प्रलंबित होता. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात दोन वेळा बैठका घेतल्या होत्या. 12 मार्च रोजी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी बसस्थानकाला प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर तातडीने हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

यामुळे प्रवाशांना काही प्रमाणात असुविधा होऊ शकते. मात्र हा रस्ता तातडीने दुरूस्त करण्याचेही निर्देश त्यांनी दिलेले आहेत. विशिष्ट कालमर्यादेत हे काम पूर्ण व्हावे यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही लक्ष देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्य बसस्थानक येथील रस्त्यांच्या दुरूस्तीच्यावेळी ड्रेनेजलाईन, पाईपलाईन, फायबर केबल यासंदर्भातील सर्व अडथळे तातडीने दुरूस्त करण्याबाबत बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

महानगरपालिका आयुक्तांकडे या बदलामुळे अनेक जबाबदाऱ्या येणार असून त्यांनी तातडीने नागरिकांना पूर्ववत बसस्थानकातील सुविधा मिळावी यासाठी जातीने लक्ष वेधण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय नव्या बसस्थानकाची तात्पुरती व्यवस्था होताना प्रवाशांची सुरक्षितता, तात्पुरते शौचालय, स्वच्छता गृहे व अन्य अनुषंगिक व्यवस्था तसेच वाहतुकीमध्ये होणाऱ्या बदलामुळे कि.मी. अंतरातील नवे टप्पे निश्चित करण्याचे काम सर्व संबंधित विभागाने वेळेच्या आत करावे, अशी सूचना त्यांनी दिली आहे. यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी, नांदेड तहसिलदार, आगार व्यवस्थापक, पोलीस वाहतुक शाखा, प्रादेशिक परिवहन विभाग व महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी आढावा घेऊन विक्रमी वेळेत हा रस्ता पूर्ण करावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!