सचखंड गुरुद्वारा बोर्डातर्फे डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास मोफत औषधांची मदत
नांदेड| सचखंड गुरुव्दारा बोर्डातर्फे डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील बाहयरुग्ण व आंतररुग्ण विभागामध्ये भरती होणाऱ्या रुग्णांच्या उपचारासाठी 12 ऑक्टोबर रोजी अत्यावश्यक औषधींचा मोफत पुरवठा करण्यात आला.
या रुग्णालयामध्ये मोठया प्रमाणात गोर-गरीब व गरजू रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात. त्यांना गुरुव्दारा बोर्डाकडून पुरविण्यात आलेल्या औषधीमुळे रुग्णसेवेस मदत होईल. अधिष्ठाता डॉ.एस.आर.वाकोडे यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या पुढाकाराने मिळालेल्या औषधींच्या मदतीबद्दल जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व सचखंड गुरुव्दारा बोर्डाचे धन्यवाद व्यक्त केले.
यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, अधिष्ठाता डॉ.एस.आर.वाकोडे, गुरुव्दारा बोर्डाचे अधीक्षक एस.ठान.सिंगजी बुंगई, दशमेश हॉस्पिटल चे डॉ.एस.परमविर सिंग, डॉ.अभिजीत देवगरे, उपवैद्यकीय अधीक्षक व इतर कर्मचारी उपस्थित होते.