भोकरचे जिल्हा सत्र न्यायाधीश यांच्या पथकाची हिमायतनगरच्या फुलेनगर शाळेला अचानक भेट

हिमायतनगर, असद मौलाना। भोकरचे जिल्हा सत्र न्यायधीश श्री गाडगे साहेब आणि हदगावचे एसडीएम संगेवार मॅडम यांनी बुधवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास अचानक फुलेनगर येथील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. यावेळी शिक्षण, महसूल, नगरपंचायत अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये धडकी भरली होती. येथील शाळा परिसरातील अस्वच्छतेबाबत न्यायधीश महोदयांनी नाराजी व्यक्त करून परिसरातील नागरिकांनी आपली शाळा, आपला परिसर आपण स्वच्छ ठेवण्याचा संदेश देऊन परिसर स्वच्छ करायला भाग पाडले आहे.
गेल्या काही दिवसापासून हिमायतनगर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांचा तपासणी दौरा भोकरचे जिल्हा सत्र न्यायाधीश यांच्या प्रमुख उपस्थितिमध्ये केला जात आहे. हिमायतनगर ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात उणीव, विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबतचा आढावा घेतला. अनेक शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता शिक्षकांची व सफाई कर्मचाऱ्यांची कमतरता यासह विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून दिल्या जाणाऱ्या सुविधांचा अभाव असल्याचे आढळून आले आहे. अनेक ठिकाणी तर शिक्षक, कर्मचारी अनुपस्थित तर शाळा अडगळीला पडल्याचे निदर्शनास आले आहे.
हा तपासणी दौरा सुरु असताना आज बुधवार दि. ११ रोजी हिमायतनगर शहरातील फुलेनगर येथील जिल्हा परिषद शाळेला सायंकाळी अचानक भेट दिली. यावेळी पथकासोबत आलेल्या वाहनांचा ताफा पाहून परिसरातील नागरिक अवाक्का झाले होते. या पथकात भोकरचे जिल्हा सत्र न्यायाधीश श्री गाडगे साहेब, हदगावचे उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, नायब तहसीलदार ताडेवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील, विस्तार अधिकारी अरुण पाटील, उपकार्यकारी अभियंता सुरज गट्टावाड, अभियंता श्री डांगे, सुरज कंधारकर आणि शिक्षण, महसूल, पोलीस यासह सर्वच कार्यालयाचे मुख्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी त्यांनी जवळपास तासभर या शाळा परिसराची पाहणी केली, तसेच येथील परिस्थितीबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याची कानउघाडणी करून याकडे लक्ष देण्याची ताकीद दिली. तसेच परिसरातील नागरिकांना देखील आपला वार्ड आपण स्वच्छ ठेऊन निरोगी जीवन जगण्यासाठी प्रयत्न करावे असे आहवान त्यांनी केले. त्यानंतर येथील नागरिकांना न्यायाधीश महोदयांनी परिसराची स्वच्छता करायला लावले. यावेळी येथील नागरिकांनी आदेश शिरसंधान मानून परिसर स्वच्छ केला. यावेळी नागरिकांनी परिसरातील समस्यांचा पाढा जिल्हा सत्र न्यायधीश श्री गाडगे यांच्या समोर मांडला आणि यापुढे आमही आमचा परिसर शाळा स्वच्छ ठेऊ असे अभिवचन दिले.
