नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आम्ही शून्यातून उभे केले आहे. या विद्यापीठाचा पाया रचताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. त्या सर्व अडचणीवर मात करून हे विद्यापीठ उभे केले. म्हणून या रोपट्याचा आज वृक्ष झाला आहे. विद्यापीठाचे नाव ठरविण्यापासून ध्वज काय असावा?, गीत काय असावे?, कोणती इमारत कुठे असावी?, कार्यालय कसे असावे?, अभ्यासक्रम, पदवी प्रमाणपत्र इत्यादी अगदी बारीक-सारीक गोष्टींचा विचार करून निर्णय घेण्यात आला होता. आता मागे वळून पाहताना गेली ३० वर्षात सर्व कुलगुरूंनी विद्यापीठाच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न केलेले आहेत. त्याचे फलित म्हणजेच आज विद्यापीठाचा झालेला विकास हा कौतुकास्पद आहे. असे गौरवोद्गार विद्यापीठाचे संस्थापक तथा माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांनी काढले.
ते दि. १८ ऑक्टोंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त २०२२-२३ च्या पुरस्कार वितरण समारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र-कुलगुरु डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, ‘जीवनसाधना गौरव’ पुरस्काराचे मानकरी प्रा. डॉ. बी. एस. ढेंगळे, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके, प्र. वित्त व लेखा अधिकारी डॉ. श्रीकांत अंधारे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. प्रशांत पेशकार, डॉ. सूर्यकांत जोगदंड, डॉ. संतराम मुंडे, नारायण चौधरी, हनमंत कंधारकर, डॉ. डी. एन. मोरे, क्रीडा विभागाचे प्र.संचालक डॉ. मनोज रेड्डी, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी सर्वप्रथम स्वामीजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर यावर्षीचा ‘जीवनसाधना गौरव’ पुरस्कार यशवंत महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्रा. डॉ. भागवत ढेंगळे यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. पंचवीस हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी त्यांनी विद्यापीठांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन ‘जीवनसाधना गौरव’ पुरस्कारांनी सन्मानित केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी त्यांच्या गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळातील विकासाचा अहवाल सादर केला. कोविड-१९ प्रयोगशाळा, जलसिंचन, वृक्ष लागवड, सामंजस्य करार, शैक्षणिक धोरण इत्यादी सारख्या महत्त्वाच्या बाबीवर त्यांनी यावेळी प्रकाश टाकला.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते इतर विविध पुरस्कारांचेही वितरण करण्यात आले. त्यामध्ये उत्कृष्ट महाविद्यालय (शहरी विभाग) पुरस्कार लातूर येथील दयानंद शिक्षण संस्थेचे दयानंद कॉलेज ऑफ लॉ यांना देवून सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट महाविद्यालय (ग्रामीण विभाग) हा पुरस्कार गंगाखेड येथील संत जनाबाई एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांना देण्यात आला. उत्कृष्ट शिक्षक (शहरी विभाग) विष्णुपुरी येथील श्री गुरुगोबिंदसिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेतील डॉ. सुहास सुधाकरराव गाजरे व नांदेड येथील यशवंत महाविद्यालयाचे प्रा. डॉ. मिर्झा मुश्ताक वसीम बेग यांना हा पुरस्कार (विभागून) देण्यात आला. उत्कृष्ट शिक्षक (ग्रामीण विभाग) धर्माबाद येथील लाल बहादुर शास्त्री महाविद्यालयाचे प्रा. डॉ. शिवाजी बळवंतराव पटवारी यांना देवून सन्मान करण्यात आला. उत्कृष्ट संकुल व तरुण संशोधक शिक्षक (विद्यापीठ संकुल) पुरस्कार डॉ. शैलेश वाढेर यांना देवून सन्मान करण्यात आला. तसेच शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कारामध्ये वर्ग-३ मधून उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार विद्यापीठातील उद्यान विभागाचे उद्यान सहाय्यक पांडुरंग सूर्यवंशी आणि लेखा विभागातील रोखपाल विकास जाधव यांना देवून सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते क्रीडा विभागातर्फे ३३ गुणवंत खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्यातर्फे ज्या खेळाडूंनी ऑल इंडिया स्पर्धेत गोल्ड, सिल्वर अथवा ब्रान्झ मेडल मिळवलेली आहेत. अशा ११ खेळाडूंना धनादेशाद्वारे प्रत्येकी ५ हजार रुपये देऊन त्यांचे मनोबल वाढविले आहे. विद्यार्थी विकास विभागातर्फे ३२ विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. परीक्षा विभागामार्फत ७८ विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे ११ विद्यार्थ्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. कुलसचिव कार्यालय तसेच शैक्षणिक व नियोजन विकास विभागातर्फे २१ कर्मचाऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पी. विठ्ठल यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. सूर्यप्रकाश जाधव यांनी केले.