
कंधार, सचिन मोरे। कंधार तालुक्यातील “प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा” लाभ काही तांत्रिक किंवा भूमी अभिलेखाची माहिती अध्यायावत न केल्यामुळे लाभार्थ्यांचे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ प्रलंबित किंवा बंद झाला असेल,अशा लाभधारकांनी तात्काळ आपल्या सज्जाचे तलाठी किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधून, लाभ का प्रलंबित आहे, याची खात्री करून घ्यावी, अन्यथा खात्री न करनारा लाभार्थी हा अपात्र समजून सदरच्या योजनेतून त्यांचे नाव वगळण्यात येईल, असे आवाहन तहसीलदार राम बोरगावकर यांनी केले आहे.
कंधार तालुक्यात “प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे” एकूण ४८ हजार ९३४ एवढे लाभार्थी असून, त्यापैकी १ हजार १७८ लाभार्थ्यांचे लँड सीडींग चुकीचे झाल्याने किंवा भूमी अभिलेखाची माहिती अध्यायावत न केल्यामुळे सदर १ हजार १७८ लाभार्थ्यांचा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ प्रलंबित आहे.
सदरील १ हजार १७८ लाभार्थ्यांची यादी तहसील कार्यालय संबंधित ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय व सेतू सुविधा केंद्रावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदरच्या प्रसिद्ध झालेल्या यादीतील शेतकऱ्यांनी लँड सीडींग कामी आवश्यक ७/१२, होल्डिंग, फेरफार नक्कल संबंधित सज्जाचे तलाठी किंवा तहसील कार्यालयात वेळेत जमा न केल्यास असे सर्व लाभार्थी अपात्र समजून वगळण्यात येतील याची नोंद घ्यावी. त्याच बरोबर ज्या शेतकऱ्यांचे रहिवासाचे गाव व ज्या गावात आपली शेती आहे, अशा दोन्ही गावांशी संबंधित असणाऱ्या तलाठी यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून आपल्या नावाची खात्री करून घ्यावी, असे आवाहन कंधारचे तहसिलदार राम बोरगावकर यांनी केले आहे.
