नांदेड| आमचे लोक उत्सवप्रिय आहेत, आणि त्यामुळेच त्यांनी महापुरुषांच्या क्रांतिकारी व ऐतिहासिक दिवसाचे रुपांतर उत्सवामध्ये केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिवस हा उत्सव नाही तर मुव्हमेंट आहे. या दिवसाचे रुपांतर मुव्हमेंटमध्ये ज्या दिवशी होईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने महापुरुषांना खरं अभिवादन होईल. तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नपुर्तीसाठी आंबेडकरवाद्यांनी शिक्षणाचं मोठं आंदोलन उभारलं पाहिजे, असे आवाहन आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम यांनी केले. ते भीम महोत्सवात उपस्थिताना मार्गदर्शन करताना बोलत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन नांदेड येथील कुसुम सभागृहात उत्साहात पार पडला. या भीम महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार हे होते तर भीम महोत्सवाचे उद्घाटन दीपक कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी समाज कल्याणचे सह. आयुक्त शिवानंद मिनगिरे, प्राचार्य शेखर घुंगरवार, डॉ. सिद्धार्थ जोंधळे, उद्योजक बालाजी इबितदार, शंकर शिंगे, स्वागताध्यक्ष दिनेश निखाते व संयोजक प्रा.प्रबुद्ध रमेश चित्ते यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना दीपक कदम म्हणाले की, शिकून कुठे नौकरी मिळते. शिकून काय व्हायचंय हे समाजातलं नकारात्मक चित्र बदलायला हवं. ज्ञान ग्रहण करणं हे रोजगाराशी संबंधित नाही. मनुष्याला मनुष्यत्व प्राप्त होण्यासाठी ज्ञानाची आणि शिक्षणाची आवश्यकता आहे. खरे तर मनुष्याला सर्वात मोठा कोणता रोग असेल तर तो अज्ञान, अविद्या आहे, आणि अविद्येला दूर करण्यासाठी आष्टांगिक हा सर्वात उत्तम मार्ग आहे. कारण सम्यक दृष्टीचा अंतिम उद्देश अविद्या नष्ट करणे हा आहे. माणसाने शिक्षण घेतलं नाही तर पशू आणि आपल्यात काय फरक आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
याप्रसंगी अध्यक्षीय समारोपात कामाजी पवार म्हणाले की, नांदेडमध्ये आज वेगळ्या रुपात हा ऐतिहासिक शाळा प्रवेश दिन साजरा होत आहे. कारण त्या काळामध्ये बहुजन समाजाला त्या व्यवस्थेने शिक्षण नाकारलं होतं. सुभेदार रामजी आंबेडकरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना शाळेत प्रवेश दिला आणि त्याचे महत्त्व लक्षात घेऊन बाबासाहेबांनीही चीज केले. म्हणून आज तो दिवस बहुजनांच्या गुलामीच्या मुक्तीचा दिवस ठरला, शिक्षणाच्या क्रांतीची बिजे रोवणारा हा दिवस ठरला. बाबासाहेबांना शिक्षणाचं महत्त्व समजलं होतं, म्हणून त्यांनी दिवसाला आठरा तास अभ्यास केला. खऱ्या अर्थाने आपण बाबासाहेबांना समजून घेतलं नाही. त्यांना समजून घेतलो असतो तर त्यांच्या स्वप्नातील भारत निर्माण झाला असला, असेही कामाजी पवार म्हणाले.
अनेक संकटं पार करून आपल्या समाजासाठी आपल्या देशाची राज्य घटना लिहिली. आजही आपण परिस्थितीला घेऊन रडत असतो, खरोखरंच त्या व्यक्तींची कीव येते. माणूस परिस्थितीवर मात करून पुढे कसा येतो हे बाबासाहेबांनी दाखवून दिले. तेव्हा आंबेडकर अनुयायांनी परिस्थितीला दोष न देता खंबीरपणे शिक्षणाची कास करावी, असा उपदेश समाज कल्याणचे सह.आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केला.
यावेळी आंबेडकरी चळवळीला योगदान देणाऱ्या मान्यवरांना आंबेडकरी निष्ठावान पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. भीम महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित सांस्कृतिक प्रबोधन कार्यक्रमात भीमशाहीर मेघानंद जाधव, विपीन तातड, स्वरूप डांगळे, कवी, गीतकार सचिन डांगळे यांनी भीम गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुरलीधर हंबर्डे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी संयोजक प्रा.प्रबुद्ध रमेश चित्ते, प्रा. विशाल बोरगावकर, नितीन एंगडे, अंकुश सावते, प्रकाश इंगळे, लक्ष्मण वाठोरे, कुणाल भुजबळ यांनी परिश्रम घेतले.