
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचा वेटलिफ्टिंग उत्कृष्ट खेळाडू आकाश गोड याने आंध्र प्रदेशात सुरू असलेल्या साऊथ-वेस्ट झोन आंतरविद्यापीठ स्पर्धेत २४३ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने या गरीब परिस्थितीतून वर येणाऱ्या होतकरू क्रीडापटू साठी आर्थिक मदतीची तरतूद करून त्यास मदत केली.
या अर्थीक मदतीचा फायदा घेत आकाश श्रीनिवास गौंड याने आंध्र प्रदेश येथील आदिकवी नानैय्या विद्यापीठ राजमुंद्री राजमहेंद्रवरम आंध्रप्रदेश येथे सुरू असलेल्या साऊथ-वेस्ट झोन अंतर विद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेत उत्कृष्ट स्नॅच व क्लिन अन्ड जर्कचे प्रदर्शन करीत सुवर्णपदक पटकाविले. या स्पर्धेत साऊथ व वेस्ट झोनमधील १० राज्यातील ७३ विद्यापीठांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेत १०८ किलो स्नॅच व १३५ किलो क्लिन अन्ड जर्क असे वजन उचलत एकूण २४३ किलोचा भार सहज उचलला या कामगिरीच्या जोरावर सुवर्णपदक पटकावून त्याची पंजाब राज्यातील जालंदर येथील एलपीयु विद्यापीठात होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
त्यास प्रशिक्षक म्हणून डॉ उस्मान गणि तर साहाय्यक प्रशिक्षक संघव्यवस्थापक म्हणून डॉ अशोक वाघमारे यांचे मार्गदर्शन लाभले आकाश गौड यांनी केलेल्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश ए. महानवर, कुलसचिव डॉ सर्जेराव शिंदे, क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी, दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, अधिसभा सदस्य प्राचार्य डॉ. दिपक बच्चेवार, डॉ. प्रदीप देशमुख, अधिसभा सदस्य डॉ. महेश बेबंडे, माजी क्रिडा संचालक डॉ. विठ्ठलसिंह परिहार, शा.शी. बोर्डाचे चेअरमन डॉ कैलास पाळणे यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
