मराठा आरक्षणासाठी आंदोलक आक्रमक, नांदेड हैदराबाद मार्गावर चक्काजाम
नायगाव रामप्रसाद चन्नावार। मराठा आरक्षणाच्या आक्रमक झालेल्या सकल मराठा समाजातील तरुणांनी मागणीसाठी सोमवारी रात्री पासूनच नांदेड हैदराबाद मार्गावर टायर जाळून रस्ते अडवण्यात आले होते. त्यामुळे वाहणाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तर काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून नायगाव येथे पंचायत समितीची जिप जाळण्यात आली तर घुंगराळा येथे रुग्नवाहिकेच्या काचा फोडण्यात आल्या. या आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले असून वाटेत अडकून पडलेल्या वाहणधारकांची मोठी गैरसोय झाली.
मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे अमरण उपोषण सुरु असून त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नायगाव तालुक्यात बंदसह चक्काजाम आंदोलन करण्यात आले. सोमवारी रात्रीपासूनच आंदोलक रस्त्यावर उतरले होते. तालुक्यातील वजिरगाव फाटा, कहाळा, कुष्णूर, घुंगराळा, कुंटूर फाटा, पळसगाव, नायगाव, नरसी, होटाळा, कोलंबी फाटा गडगा व खंडगाव येथे रस्त्यावर टायर जाळून चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
यावेळी आंदोलक आक्रमक झालेले दिसून आले असून त्यांनी शासन व राजकीय नेत्यांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी करुन परिसर दणाणून सोडला. सोमवारी रात्रीपासून सुरू झालेले आंदोलन मंगळवारी सायंकाळपर्यंत सुरुच होते. गावोगावी तरुणाई मोठ्या प्रमाणावर आंदोलनात दिसून आली. आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही असा निर्धार तरुणांनी केला आहे. आंदोलनादरम्यान काही तरुण आक्रमक झालेले दिसून आले. सोमवारी रात्री घुंगराळा येथे काहींनी खाजगी बसच्या काचा फोडल्या तर मंगळवारी सकाळी रुग्नवाहिकेच्या काचा फोडण्यात आल्या.
विशेष म्हणजे रुग्नवाहिकेतून प्रवासी वाहतूक करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले त्यामुळेच काचा फोडण्यात आल्याचे समजले. मराठा आरक्षण आंदोलनाची धग वाढतच असून सोमवारी रात्री २ वाजताच्या दरम्यान काहींनी पंचायत समितीच्या आवारात उभ्या असलेली पंचायत समितीच्या शासकीय वाहणाला आग लावली. लावलेल्या आगीत पंचायत समितीची जिप जळून खाक झाली. सदर प्रकरणी गटविकास अधिकारी वाजे यांनी नायगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली असल्याची माहिती मिळाली आहे.
कुष्णूर येथे आंदोलकांनी महामार्ग आडवला होता. मंगळवारी दुपारी आंदोलक व बंदोबस्तावर असलेल्या पोलीसासोबत बाचाबाची झाली यावेळी पोलिसांनी लाठीहल्ला केला असून यात विजय बालाजी जाधव, अंकुश संभाजी जाधव व व्यंकट संभाजी पवार हे तीन तरुण जखमी झाले आहेत. या जखमींना पुढील उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आले आहे. या घटनेनंतर कुष्णूर येथे अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात आला असून वरिष्ठ अधिकारी तळ ठोकून बसले आहेत. लाठीहल्ल्याच्या घटनेनंतर कुष्णूर येथे तणावाची परिस्थिती आहे.