नांदेड घटनेच्या चौकशीअंती दोषींवर कारवाई केली जाईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई| नांदेड येथील शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यूची घटना घडली ती अतिशय गंभीर आणि दुर्दैवी आहे. झालेल्या संपूर्ण घटनेला सरकारने गांभीर्याने घेतले आहे. यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि संबंधित सचिव व अधिकारी प्रत्यक्ष घटनास्थळी गेलेले आहेत. त्यामुळे चौकशीअंती दोषींवर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही ते मुंबईत पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
यावेळी पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, या घटनेसंदर्भात प्राथमिक माहिती घेतली असता रुग्णालयात 127 प्रकारच्या औषधांचा साठा होता. विशेष म्हणजे त्याउलट त्या रुग्णालयात नवीन औषधी खरेदीसाठी 12 कोटी रुपयांचा निधीला देखील मान्यता दिलेली होती. संबंधित मृत्यू झालेल्या रुग्णांबाबत आम्ही प्राथमिक माहिती घेतली आहे. यात विशेष करुन काही वयोवृद्ध लोक होते. तर लहान बालके ही प्री-टर्म होती. चौकशीअंती जे काही समोर येईल. त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.