नांदेड। डझनभर आंदोलने करून पूरग्रस्तांना अनुदान मंजूर करणाऱ्या सीटूच्या कार्यकर्त्यांचा संघर्ष अजूनही सुरूच आहे.
अख्या महाराष्ट्रात जुलै महिन्यात अतिवृष्टी झाली होती.कुठेही पूरग्रस्तांना अनुदान मंजूर झाले नाही परंतु नांदेड सीटू संघटनेने सातत्याने आंदोलने करून अखेर सानुग्रह अनुदान निधी खेचून आणण्यासाठी शासनास भाग पाडले आहे. नांदेडचे उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी पावसाळी अधिवेशनात विधी मंडळात मागणी केल्यामुळे देखील अनुदान मंजूर होणे सोपे झाले होते. दक्षिणचे आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांनी सुद्धा पाठपुरावा केला आहे. मोर्चे,उपोषण,धरणे, सत्याग्रह आणि सर्व प्रकारचे आंदोलने करणाऱ्या अनेक खऱ्या नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना जाणीवपूर्वक डावलण्यात आले आहे.
सर्वेक्षण करणाऱ्या वसुली लिपिक आणि तलाठ्यानी अर्थपूर्ण हीत साधत अनेकांना पात्र यादीत टाकले नाही किंबहुना काही बड्या पैसेवाल्या लोकांच्या घरातील चार – चार लोकांना अनुदान मिळण्यासाठी पात्र ठरविले आहे. त्यांच्या मोबाईल फोनचा कॉल डिटेल्स रेकॉर्ड तपासून कारवाई करावी ही मागणी देखील खऱ्या पूरग्रस्तांनी सातत्याने केली आहे.
दुसरी यादी तातडीने प्रसिद्ध करावी. राहिलेल्या नुकसानग्रस्तांना पात्र यादीत समाविष्ट करून त्यांच्या बँक खात्यात अनुदान वर्ग करावे. पूरग्रस्तांच्या निधीत अनियमितता करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी. पात्र यादी तहसीलदार नांदेड यांना देण्यात यावी तसेच युनियनला एक पत्र देण्यात यावी ह्या मागण्यासाठी सीटू संलग्न मजदूर युनियनच्या वतीने महापालिकेच्या मुख्य प्रवेश द्वारा समोर बेमुदत अमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे.जोपर्यंत खऱ्या पूरग्रस्तांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार नाहीत तोपर्यंत उपोषण सुरु राहील असा इशारा सीटूचे जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड यांनी दिला आहे.
या उपोषणात कॉ. गंगाधर गायकवाड,कॉ.श्याम सरोदे,कॉ.सोनाजी कांबळे, कॉ. करवंदा गायकवाड, कॉ.लता गायकवाड,कॉ.राजेश दाढेल, जयभारत सूर्यवंशी आदिजन ठाण मांडून महापालिकेच्या समोर उपाशी बसले आहेत तर त्यांच्या हाकेला ओ देत शकडो पूरग्रस्तसोबत आहेत. कर्तव्यदक्ष आयुक्त काय निर्णय घेतात याकडे नांदेड शहरातील पूरग्रस्तांचे लक्ष लागलेले आहे.