
(१० ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथून मोर्चा काढून जि.प.सिईओना निवेदन देणार – कॉ. गायकवाड )
नांदेड। मागील पन्नास वर्षात माहूर तालुक्यातील वझरा गावात प्लॉट्स पडले नाहीत म्हणून अनेकजण गावसोडून डोंगर दऱ्यात राहत आहेत तर काहीनी इतर गावात स्थलानंतर केले आहे.
ही परिस्थिती स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष साजरे होत असताना घडत आहे.
मात्र ही बाब नांदेड प्रशासनास आहे तेवढी गंभीर वाटत नाही किंबहुना हे आश्चर्यकारक वाटत नाही. सीटू कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद,तहसील व पंचायत समिती माहूर येथे मोर्चे आंदोलने करून वझरा ता.माहूर प्लॉट्स पाडून द्यावेत व घरकुल बांधण्यासाठी पाच लाख रुपये द्यावेत ही मागणी सातत्याने केली आहे. एक ऑक्टोबर पासून तीन ऑक्टोबर पर्यंत शेकडो अर्जदारांनी सीटू संघटनेच्या नेतृत्वाखाली वझरा येथे सामूहिक बेमुद्दत उपोषण केले आहे.
परंतु वादग्रस्त असलेल्या माहूर तहसीलदार आणि गट विकास अधिकाऱ्यांनी जन मागणीला कवडीमोल समजून कुठलीही कारवाई केली नाही.ह्या निष्ठुर आणि मस्तमवाल अधिकाऱ्यांची हाकालपट्टी करावी ही मागणी जोर धरू पाहत आहे. या निष्ठुर अधिकाऱ्यांनी दहा किलो मीटर अंतरावर सुरु असलेल्या उपोषणास भेट देण्याचे कर्तव्य देखील पूर्ण केले नाही. जाणीवपूर्वक गांधी जयंती दिनी दोन ऑक्टोबर रोजी होणारी ग्राम सभा घेण्यात आली नाही. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी एक वर्षांपूर्वी पत्र काढून कारवाई करण्याचे आदेश दिले असताना त्यास केराची टोपली सखविण्यात आली.
हा सर्वच प्रकार गंभीर आहे. तीन ऑक्टोबर रोजी किनवट – माहूर मतदार संघांचे आमदार भीमराव केराम यांनी वझरा येथे येऊन गावाकऱ्यांचे उपोषण सोडविले आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालया कडून दंडाधिकारी शाखे कडून पत्र काढून जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी, माहूरचे तहसीलदार आणि पं. स.चे गट विकास अधिकारी यांना योग्य कारवाई करण्याचे सूस्पष्ट शब्दात आदेशीत केले आहे.परंतु हे महोदय दखल घेण्यास तयार नाहीत.
तसेच सीटू कामगार संघटनेच्या वतीने वरील संबंधिताना भेटून संपर्क साधण्याचे कॉ. गंगाधर गायकवाड यांना लेखी कळविले आहे. या सर्व अधिकाऱ्यांना भेटण्याचे निश्चित झाले असून येत्या दहा ऑक्टोबरला जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून मुख्य कार्यकारी अधिकारी व पंचायतचे उप मुख्य कार्यकारी यांना भेटून निवेदन देण्याचे सीटू मजदूर युनियनने ठरविले आहे.
मागील दोन वर्षांपासून पाठपुरावा सुरु असून लवकरात लवकर प्लॉट्स पाडून द्यावेत अन्यथा आम्हाला स्वतः गावाखारी येथे प्लॉट्स पाडून अतिक्रमण करावे लागेल असा इशारा सीटू कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी तथा मजदूर युनियनचे अध्यक्ष कॉ.गंगाधर गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे. मागणी करणारे बहुतांश अर्जदार हे आदिवासी,दलित, इतर मागास वर्गीय व विमुक्त भटक्या जमाती मधील आहेत.त्यामुळे तातडीने वझरा येथे प्लॉट्स पाडून अर्जदारांना न्याय देणे आवश्यक आहे.
