नांदेड/हिमायतनगर। हिंगोली लोकसभा मतदार संघातील हिमायतनगर, हदगाव, किनवट व माहूर या तालुक्यातील आदिवासी मुला – मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी. याकरिता त्यांच्यासाठी प्राधान्याने शासकीय वस्तीगृह उभारले जावे, अशी खासदार हेमंत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली होती. त्यांची मागणी लक्षात घेत कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिमायतनगर येथे शासकीय वस्तीगृह उभारणीसाठी २४ कोटी रुपयांच्या निधीस मंजूरी दिली आहे.
खासदार हेमंत पाटील यांनी २० नोव्हेंबर २०२३ रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे वरील मागणी केली होती. त्यांनी दिलेल्या पत्रात म्हटले होते की, हदगाव, हिमायतनगर, किनवट व माहूर हे तालुके आदिवासी बहुल भाग म्हणून ओळखले जातात. या भागातील विद्यार्थ्यांचे घर आणि शाळेपासूनचे अंतर जास्त असल्याने व जिल्ह्यापासून देखील शाळा ६० – ७० किलोमीटर अंतरावर असल्याने अनेक विद्यार्थी – विद्यार्थिनींना मनात इच्छा असतांना देखील शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. आदिवासी बहुल भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये. त्यांना देखील आपल्या गावापासून जास्त दूर न जाता वस्तीगृहात राहुन शिक्षण घेता यावे असे राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी पत्र व्यवहार केला होता. या मागणीला यश आले असून हिमायतनगर येथे आदिवासी मुला मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून वस्तीगृह उभारणीसाठी २४ कोटी रुपयांच्या निधीस राज्य सरकारने मंजूरी दिली आहे.
कर्तव्यदक्ष सरकारने खासदार हेमंत पाटील यांची मागणी लक्षात घेऊन हिमायतनगर या आदिवासी बहुल भागासाठी २४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्यानंतर खासदार हेमंत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, हिंगोली लोकसभा मतदारसंघातील हदगाव आणि हिमायतनगर ही दोन्ही तालुके आदिवासी बहुल भागात मोडत असल्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण अतिशय चिंताजनक असून, त्यासाठी विद्यार्थ्यांना शासकीय वस्तीगृहाची अतिशय गरज होती आणि ही गरज आता पूर्ण होणार असून, अनेक विद्यार्थ्यांना भविष्यात शिक्षणापासून वंचित राहावे लागणार नाही. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्या कार्यतत्परते बद्दल समाधान व्यक्त करून अतिशय कमी कालावधीमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहासाठी २४ कोटी रुपयांचा निधीस मंजूरी दिली. ही अतिशय चांगली गौरवास्पद बाब आहे असेही त्यांनी म्हटले आहे.