लाईफस्टाईल

सुंदर महाराष्ट्राच्या दिशेने ठोस पाऊल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई। आज गिरगाव चौपाटी येथे सागराच्या साक्षीने सुंदर महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल टाकण्यात आले. उत्साही नागरिक, विद्यार्थी यांच्या जोडीने, राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मान्यवरांनी स्वत: हातात झाडू घेऊन श्रमदान केले आणि स्वच्छतेसाठी ‘एक तारीख एक तास’ या राज्यस्तरीय मोहिमेची सुरुवात केली. सुंदर महाराष्ट्र, सुंदर भारत घडविण्यासाठी आपण टाकलेले हे मोठे पाऊल असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामुळे आज स्वच्छतेची ही लोकचळवळ झाली आहे असे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. राज्यात शहरी आणि ग्रामीण मिळून ७२ हजारांपेक्षा जास्त ठिकाणी स्वच्छतेची ही मोहीम पार पडली असून त्याबद्धल मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.

उद्या (२ ऑक्टो) रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यभर नागरिकांच्या श्रमदानाने स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. नगरविकास विभागाच्या वतीने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले. गिरगाव चौपाटी येथे शुभारंभासाठी मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनोज सौनिक, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव के एच गोविंद राज, ज्येष्ठ क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर, इस्रायलचे कौन्सिल जनरल श्री कोबी, कोस्टगार्ड महासंचालक कैलाश नेगी, अभिनेते नील नितीन मुकेश, पद्मिनी कोल्हापुरे, जुही चावला, सुबोध भावे आदींची उपस्थिती होती.

या ऐतिहासिक मोहिमेत सर्वांनी घेतलेल्या उत्स्फूर्त सहभागासाठी धन्यवाद देताना मुख्यमंत्री म्हणाले की, प्रधानमंत्र्यांनी जेव्हा पहिल्यांदा लाल किल्ल्यावरून ‘स्वच्छ भारत’ची घोषणा केली आणि स्वत: झाडू घेऊन रस्त्यावर उतरले, तेव्हा अनेकांनी त्यावर टीका केली आणि खिल्ली उडविण्याचा प्रयत्न केला. पण सगळी जनता जेव्हा या अभियानात उतरली आणि जो इतिहास त्यानंतर रचला तो सगळ्या जगाने पाहिला आणि टीकाकारांची तोंडं बंद झाली. प्रधानमंत्री म्हणतात त्याप्रमाणे, स्वच्छता हा काही केवळ एक दिवस आणि कुणीतरी एकानेच राबविण्याचा कार्यक्रम नाही, तर ती नेहमीसाठीची आपली जीवनशैली असली पाहिजे.

स्वच्छता फक्त कागदावर नको
स्वच्छता हीच सेवा हे अभियान महत्त्वाचं आहे. ते कागदावर ठेवू नका. प्रत्यक्ष फिल्डवर काम दिसलं पाहिजे. आजचा दिवस झाला की संपलं, असं नाही. आज स्वच्छता आणि उद्या कचरा असं होता कामा नये. असेही मुख्यमंत्री म्हणाले. स्वच्छतेत महाराष्ट्राला देशात अव्वल स्थान मिळवून देऊया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी केले.

गडकिल्ले, मंदिर परिसरात स्वच्छता
राज्यातल्या गडकिल्ले, धार्मिक स्थळे, मंदिरे यांच्या परिसरातदेखील स्वच्छता असली पाहिजे. ही तीर्थक्षेत्रे सुंदर दिसली पाहिजेत यासाठीदेखील सर्वांनी सहभागी होऊन काम केले पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामुळे जगात भारताचा डंका वाजत आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, जे पन्नास साठ वर्षात जमले नाही ते प्रधानमंत्र्यांनी गेल्या आठ नऊ वर्षांत केले आणि देशात स्वच्छतेचे काम झाले, भ्रष्टाचाराची सफाई झाली.

चौपाटीवर नागरिकांचा उत्साह
गिरगाव चौपाटीवर येताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रथम ग्रीनलॉन्स स्कूलच्या छोट्या विद्यार्थ्यांमध्ये मिसळले. हे विद्यार्थी स्वच्छतेच्या मोहिमेत सहभागी होण्यासाठी आपल्या शिक्षकांबरोबर आले होते. मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांबरोबर हस्तांदोलन केले आणि त्यांचे कौतुक केले. जोगेश्वरीच्या मर्कझ उल मारिफ एज्युकेशन अँड रिसर्च सेंटरचे विद्यार्थीसुद्धा स्वच्छतेसाठी गिरगाव चौपाटीवर आले होते. मुख्यमंत्री त्यांच्याशी देखील बोलले.

आज चौपाटी येथे स्वच्छता स्वयंसेवकांच्या जोडीने अनेक संस्थादेखील उतरल्या होत्या. स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आलोक कुमार स्वत: त्यांच्या कर्मचाऱ्यांसह आले होते. याशिवाय नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, एनसीसी, गुरुनानक हायस्कूल,नवनीत कॉलेज, सागरी सीमा मंच, उत्कल सेवा समिती, नैशनलं हौसिंग बँक, सेंट झेव्हियर्स कॉलेज तसेच पोलीस, होमगार्ड्स, महानगरपलिका कर्मचारी यांनी उत्साहाने या मोहिमेत भाग घेतला. यावेळी स्वच्छ महाराष्ट्र- स्वच्छ भारताच्या घोषणा देण्यात येत होत्या. प्रारंभी जय जय महाराष्ट्र माझा राज्य गीताने गिरगाव चौपाटीवर कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी स्वच्छतेची प्रार्थनादेखील घेण्यात आली.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!