बाल विवाह मुक्त भारतासाठी सर्वांनी एकत्रित येवून चळवळीचे स्वरूप द्यावे – प्रणिताताई देवरे-चिखलीकर
नांदेड| बाल विवाह मुक्त भारतासाठी सर्वांनी एकत्रित येवून चळवळीचे स्वरूप द्यावे असे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्या तथा सामाजिक कार्यकर्त्या प्रणिताताई देवरे-चिखलीकर यांनी केले. जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभाग, जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठाण व कैलास सत्यार्थी फांऊडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद प्रांगणात बाल विवाह मुक्त भारत अभियानासाठी मेणबत्ती प्रज्वलीत करुन शपथ घेण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे त्या म्हणाल्या, बाल विवाह मुक्त भारतसाठी आम्ही सुद्धा राजकीय मंडळी म्हणून यामध्ये सहभाग घेऊ. याचा प्रचार आणि प्रसार गावागावांमध्ये असेल, मंडळांमध्ये असेल आम्ही करू. पण नांदेड जिल्ह्याचे नाव एकच चांगल्या कामासाठी देशात स्तरावर घेतल्या जाण्यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न करणे खुप गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या. जर एखादा बालविवाह होत असेल तर एक कॉल करून पोलिसांना सांगितले तर ते तुमचे नाव गुप्त ठेवले जाते. त्यासाठी समाजाचा घटक म्हणून प्रत्येकांनी समोर आले पाहिजे.
दिनांक 1 एप्रिल 2023 नंतर ज्या घरामध्ये मुलगी जन्माला येईल, ती जन्मल्या बरोबर पाच हजार रुपये तिच्या खात्यात टाकणे असेल, ती मुलगी पहिलीला गेली की 6 हजार रुपये, ती मुलगी सहावीला गेली की 7000 तिच्या खात्यात जमा केले जातील. मुलगी 11 वीला गेली की तिच्या खात्यामध्ये 75 हजार रुपये म्हणजे एकूण एक लक्ष एक हजार रुपये त्या मुलीच्या खात्यामध्ये जमाकरण्याची तरतूद सरकारने कली आहे. लेक लाडकी या योजनेअंतर्गत आपली लेख आता लखपती होणार आहे, यामागे आपण उद्देश समजावून घेतला पाहिजे की, मुलीच्या जन्माला नकार न देता तिच्या जन्माचे स्वागत केले पाहिजे, असेही प्रणिताताई देवरे-चिखलीकर म्हणाल्या.
या प्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-कदम यांनी कर्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी, जनसेवा व कैलास सत्यार्थी फांऊडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते.