कृषीनांदेड

शेतीपूरक उद्योग व्यवसाय, सहकार चळवळीकडे सकारात्मक दृष्टीने पाहणे आवश्यक – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

नांदेड| शेती व शेतकरी समृद्ध होण्याचा मार्ग हा शेतीपूरक व्यवसायात दडलेला आहे. तो भक्कम होण्यासाठी सहकार चळवळीची राज्यात महत्त्वपूर्ण जोड देवून पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी शेती व शेतकऱ्यांना एक समृद्ध मार्ग दिला. ज्या सहकाराच्या माध्यमातून राज्याच्या ग्रामीण भागाची पायाभरणी झाली त्या सहकार चळवळीचा सकारात्मक विस्तार राज्यात झाला नाही अशी, खंत महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

नियोजन भवन येथे पद्यश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषद आयोजित शेतकरी सन्मान सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुर्यकांता पाटील, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार राजेश पवार, आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ परभणीचे कुलगुरु डॉ. इंद्रमणी, पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे डॉ. अनिल भिकाने, संतुकराव हंबर्डे, कृषी परिषदेचे अध्यक्ष भागवत देवसरकर आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.

सहकार महर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी महाराष्ट्रात सहकारी चळवळीचा पाया घातला. सहकार चळवळीच्या माध्यमातूनच शेतकऱ्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल घडणे शक्य झाले. मराठवाडा व विदर्भात मात्र सहकार चळवळी पूर्ण ताकदीने व यातील सत्वाने उभ्या राहील्या नाहीत असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. या भागात शेतकऱ्यांच्या विकासासाठी आजही सहकार चळवळीची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकरी स्वत: खूप मोठा संशोधक आहे. संशोधनाच्या माध्यमातून अनेक प्रगत शेतकरी शेतीत नवनवीन प्रयोग करुन भरघोस उत्पादन घेत आहेत. अशा प्रगतशील शेतकऱ्यांना सोबत घेवून इतर शेतकऱ्यांना प्रगत शेती करण्यास कृषी विद्यापीठांनी प्रोत्साहीत केले पाहिजे. कृषी संशोधन केंद्रानी त्यांना सोबत घेवून संशोधन करण्यावर भर दिला तर वेगळे चित्र दिसेल. शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेती करण्यावर भर देवून रासायनिक खतांचा अति वापर टाळला पाहिजे. शेती व शेतकरी हे क्षेत्र प्रयोगशील असून ही प्रयोगशिलता शेतकऱ्यांचे आत्मबल वाढवेल, अशा विश्वास महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

शेतकऱ्याच्या मुलांनी अधिक तंत्रकुशल होण्याची गरज – माजी केंद्रीय राज्यमंत्री सुर्यकांता पाटील

मराठवाड्यासारख्या भागातील पाण्याचे दुर्भिक्ष लक्षात घेवून केंद्रीय राज्यमंत्री असताना शेततळ्यासारखी अभिनव योजना भारतात प्रथम सुरु करण्याची संधी मला मिळाली. मराठवाड्यातील शेतकरी या योजनेतून अधिक संपन्न होईल असा विश्वास त्यावेळी होता. अन्य विभागातील व मराठवाड्यातील काही शेतकऱ्यांनी या योजनेचा पुरेपूर तंत्रशुद्ध लाभ घेवून प्रगती साध्य केली. बहुसंख्य शेतकऱ्यांनी या योजनेच्या अनुदानाकडे पाहून पाहिजे तसा या योजनेचा लाभ घेतला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. शेती ही आता कष्टाची आहे. शेतकऱ्यांच्या मुलांनी कष्टासमवेत तंत्रकुशलताही मिळविली पाहिजे. सुरक्षा, शिक्षा व आरोग्य ही शासनाची जबाबदारी असून या त्रिसूत्रीवर विकासाचा पाया भक्कम होणे अधिक गरजेचे आहे असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठवाड्यातील बहुतांश भाग हा कोरडवाहू आहे. येणाऱ्या संकटातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी कृषी व पशुसंवर्धन यांचा सुयोग्य समन्वय कसा साधला जातो हे अधिक महत्त्वाचे आहे. यादृष्टीने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व महाराष्ट्र पशु व मस्त्य विज्ञान विद्यापीठ मिळून संयुक्त प्रयत्नावर आम्ही भर देत असल्याचे कुलगुरु डॉ. इंद्रमणी यांनी सांगितले. विदर्भासारखी मराठवाड्यातील काही भागात अतिवृष्टीने जमीन खरडून गेल्याने काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले. अतिवृष्टीपाठोपाठ यलो मोझॅक मुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. लोहा व कंधार भागात नुकसान अधिक आहे. शासनाने या भागातील शेतकऱ्यांना अधिक मदत द्यावी, अशी विनंती आमदार राम पाटील रातोळीकर यांनी केली.

या कार्यक्रमात पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषद यांच्यावतीने मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जिल्ह्यातील उल्लेखनिय योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांचा शाल, सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला. व्यंकट पाटील, दशरथ संभाजीराव कपाटे, दत्ता पाटील हडसणीकर, मिथेलेश हरीशचंद्र देसाई, माधव लक्ष्मणराव राऊत, अनंत कबिरदास कदम, डॉ. जे.एच.कदम, निलेश पुनमचंद सोमाणी, तुकाराम रामजी गवळी, त्रिभुवन चव्हाण कंजारकर, मंगेश केशवराव इंगोले, संदीप सुरेश हंबर्डे, रमेश नंदकुमार पंडीत, मंजूषा गुलाबराव पावडे, प्रमोद पंजाबराव देशमुख, वसंत रामजी घोरबांड, सागर निळकंठअप्पा रावले, प्रल्हाद पाटील हडसनीकर, दत्तराव किशनराव तावडे, सुदेश नारायणराव शिंदे, दिलीप बळीराम पवार, शंकर चव्हाण उंचाडेकर, विनायक जाधव, प्रा. महेश देशमुख, दिगंबर अर्जूनराव जाधव यांचा सन्मान करण्यात आला. तसेच विशेष सन्मान दत्ता पाटील हडसणीकर, आत्माराम पाटील वाटेगावकर, एकनाथ पाटील बोरगावकर, डॉ. अविनाश खंदारे पाटील-उमरखेड यांचा करण्यात आला. यासोबत पशुसंवर्धन विभागाचे डॉ. भुपेंद्र बोधनकर, किनवटचे उपविभागीय कृषी अधिकारी राजकुमार रणवीर, कंधार तालुक्यातील बाचोटी येथील पशुपालक विठ्ठल बालाजी पांडरणे, डॉ. साईनाथ पवार, डॉ. राजीव टरफेवाड, डॉ. अविनाश बुन्नावार, डॉ. सपना पेदुलवार, डॉ. मारोजी कानोळे यांचा सन्मान करण्यात आला. दत्ता जाधव यांनी आभार मानले.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!