नांदेड (प्रतिनिधी) भाग्यनगर व बारड परिसरातील मंदिर चोरी व घरफोडीप्रकरणी दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा, नांदेडच्या पथकाने जाळ्यात ओढले. त्यांच्या ताब्यातून तब्बल ₹32,000 इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मा. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली व ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत ही कारवाई पार पडली. या कारवाईत अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव, अर्चना पाटील तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांचे विशेष योगदान राहिले.

पथकाने गुप्त माहितीच्या आधारे नांदेड कोर्ट मागील रस्त्यावर मोनार्क कॅन्सर हॉस्पिटलजवळ दोन संशयित इसमांना पकडले. ते पळ काढण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींची नावे सुरज रामकिशन घेणे (वय 24, रा. लक्ष्मीनगर, नांदेड, मूळ निजामाबाद) व अक्षय ऊर्फ भोप्या सुरेश कांबळे (वय 23, रा. आंबेडकर नगर, नांदेड) अशी उघड झाली.

दोघांकडून पंचासमक्ष अंगझडतीदरम्यान एकूण ₹32,000 रोख रक्कम मिळाली. चौकशीत त्यांनी दोन महिन्यांपूर्वी भाग्यनगर येथील संगमेश्वर मंदिर व बारड येथील एका घरातून चोरी केल्याची कबुली दिली. आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कार्यवाहीसाठी भाग्यनगर पोलीस ठाण्यात हस्तांतरित करण्यात आले आहेत. या यशस्वी कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी संपूर्ण पथकाचे कौतुक केले.
