श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| माहूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांच्या नियमबाह्य कामाच्या चर्चाना वन मित्र बंडू राठोड यांनी उपोषणास बसण्याचा इशारा देऊन वाचा फोडल्याने प्रचंड खळबळ उडाली असून तुळशी येथील राजे अनंतराव देशमुख यांनीही दि 12 रोजी अर्ज दिला. सोबतच रूपला नाइक तांडा येथील विजय आनंदराव राठोड यांचे सह जुनापाणी येथील कैलास राजाराम चव्हाण यांनीही 12 रोजी अर्ज देऊन त्यांची देयके न दिल्यास दि 1.10.2025 रोजीच उपोषणास बसण्याबाबतचे निवेदन दिल्याने महात्मा गांधी जयंती पूर्वी वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांच्या नियमबाह्य कारभाराची व्याप्ती प्रचंड मोठी असल्याने वरिष्ठ चौकशी करून अन्यायग्रस्तांना न्याय देतील का अशी चर्चा माहूर तालुक्यात सुरू झालेली आहे.

माहूर तालुक्यात वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव रुजू झाल्यापासून त्यांनी मोठ्या प्रमाणात जंगलातील सर्व प्रकारची कामे स्वतःच आपल्या गावाकडील कंत्राटदारांच्या नावे घेऊन केली. यामध्ये तार कंपाऊंड बॉउंडरी पिल्लर वनतळे रोपवन रोपवाटिका रोप लागवड खड्डे कर डिप सीसीटी टीसीएम जाळरेषा पानोशी माती नाला बांध गॅबियन बंधारे एल बी एस यासह इतर कामे मर्जीनुसार केल्याने यामध्ये प्रचंड आणि अनियमितता झाली. रोपवाटिका साठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन त्यांना रकमा न देणे तसेच इतरांच्या नावावर कामे घेऊन तिसऱ्यानाच कामे देणे बाउंड्री पिलर निकृष्ट दर्जाचे बनविणे यासह अनेक विषयावर गेल्या चार वर्षात अनेक तक्रारी झाल्या परंतु वरिष्ठांनी याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे तीन वर्षापेक्षा कुठलाही अधिकारी एका ठिकाणी राहू नये असे शासनाचे नियम असताना नांदेड जिल्हा उपवनसंरक्षक केशव वाबळे आणि वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक माहूर रोहित जाधव यांना एक वर्ष मुदतवाढ देऊन कोणी थांबविले हा विषय पण चर्चेचा ठरत आहे.

माहूर वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाला लागून वन उद्यान गार्डन चे काम सुरू असून, या कामातही प्रचंड अनियमित्ताचा होत आहे. कोट्यावधी रुपयाच्या या उद्यानासाठी संरक्षक भिंत बांधणे ऐवजी तार कंपाऊंड केले असून, ते पण निकृष्ट दर्जाचे झाल्याच्या तक्रारी झाल्या होत्या. परंतु याचीही चौकशी केली नाही. आता मात्र त्यांच्या कारभाराचे बिंग मोठ्या प्रमाणात फुटल्याने चौघांनी एकाच दिवशी वेगवेगळे विषयावर उपोषणाचे हत्यार उपसल्याने वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांच्या भ्रष्टाचाराच्या कथा गल्लीबोळात सुरू झाल्या असून दि 1.10 2025 पर्यंत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले तहसीलदार अभिजीत जगताप पोलीस निरीक्षक गणेश कराड यांचे वनविभागाचे वरिष्ठ याप्रकरणी चौकशी करून अर्जदारांना त्यांच्या रकमा द्यावयास लावतील का याकडे नांदेड जिल्ह्यासह माहूर तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

