नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून विविध नव्या आणि रोजगारक्षम पदवी अभ्यासक्रमांची सुरुवात करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमांचे उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना आधुनिक कौशल्ये, थेट उद्योगाशी जोडलेले शिक्षण, आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय करिअरच्या संधी प्रदान करणे हा आहे. अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम (AEDP) अंतर्गत सुरू करण्यात आलेला हा कोर्स कुलगुरू डॉ. मनोहर चासकर आणि प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांच्या पुढाकाराने सुरू झाला आहे.
1. बी.एससी. एमएलटी (मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी)
जैवशास्त्र संकुलात सुरू करण्यात आलेला B.Sc. in Medical Laboratory Technology (MLT) हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रयोगशाळा विज्ञानाचे सैद्धांतिक आणि व्यावहारिक प्रशिक्षण देतो. यात क्लिनिकल बायोकेमिस्ट्री, सूक्ष्मजीवशास्त्र, रोगप्रतिकारशास्त्र, पॅथॉलॉजी, आण्विक निदान, रक्तपेढी व्यवस्थापन यांचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक उपकरण हाताळणी, गुणवत्ता नियंत्रण, डेटा विश्लेषण, आणि औपचारिक संवाद कौशल्ये शिकवली जातात. अभ्यासक्रमानंतर सरकारी आणि खाजगी क्षेत्रात भरपूर रोजगाराच्या संधी उघडतात.
2. बी.ए. इन फ्रेंच (B.A. French)
विद्यापीठात सुरू झालेला तीन वर्षांचा बी.ए. फ्रेंच हा अभ्यासक्रम फ्रेंचसह स्पॅनिश या आंतरराष्ट्रीय भाषेचे शिक्षण देतो. यात व्यावसायिक क्षेत्रातील भाषिक कौशल्ये, संवादतंत्र, अनुवाद, पर्यटन, शिक्षण आणि आंतरराष्ट्रीय सेवेतील संधींसाठी प्रशिक्षण दिले जाते. हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना स्थानिक आणि जागतिक स्तरावर शिक्षण, रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी प्रदान करतो.
3. बी.कॉम इन बँकिंग आणि टॅक्सेशन (B.Com in Banking & Taxation)
कॉमर्स अँड मॅनेजमेंट सायन्सेस संकुलात सुरू झालेला B.Com (Banking & Taxation) हा व्यावसायिक अभ्यासक्रम बँकिंग व्यवहार, खाती व्यवस्थापन, आयकर, GST, बिझनेस कायदे, लेखापरीक्षण अशा विषयांमध्ये सखोल ज्ञान देतो. प्रशिक्षणासाठी चार्टर्ड अकाउंटंट्स आणि बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांचा सहभाग असणार असून, केस स्टडीज, फील्ड व्हिजिट्स, रिअल टाईम प्रोजेक्ट्सच्या माध्यमातून उद्योगजगतातील अनुभव दिला जाईल. अभ्यासक्रमानंतर बँकिंग, लेखा, कर सल्लागार, फायनान्शियल अनालिस्ट अशा विविध पदांवर रोजगाराच्या संधी उपलब्ध असतील.
4. बी.एससी. इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड इंटरनेट ऑफ थिंग्ज (AI & IoT)
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज (AI & IoT) या अभ्यासक्रमामध्ये स्मार्ट डिव्हाइसेस, डेटा विश्लेषण, मशीन लर्निंग, क्लाउड नेटवर्किंग, सायबर सुरक्षा इत्यादी विषयांवर सखोल शिक्षण दिले जाते. अभ्यासक्रमात प्रथम वर्षी प्रोग्रामिंग, गणित, मायक्रोकंट्रोलर्स, दुसऱ्या वर्षी मशीन लर्निंग, IoT आर्किटेक्चर, तर अंतिम वर्षात डिप लर्निंग, सायबरसिक्युरिटी, आणि इंडस्ट्री प्रोजेक्ट्स यांचा समावेश आहे.
या कोर्सद्वारे विद्यार्थी AI Developer, Data Scientist, Embedded System Architect, IoT Solution Designer अशा पदांवर काम करण्यास सक्षम होतात.
सर्व अभ्यासक्रम विद्यापीठाच्या कॅम्पस परिसरात अत्याधुनिक सुविधा आणि उद्योगाभिमुख मार्गदर्शनासह राबवले जात आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर ( srtmunadm.samarth.edu.in ) प्रवेशासाठी लवकरात लवकर अर्ज करावा.
