नांदेड| येथील ज्येष्ठ आणि निष्ठावंत समाजवादी नेते सूर्यकांत वाणी यांचे आज सकाळी उपचारा दरम्यान निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 62 वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन विवाहित मुली, एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज रामघाट येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
नांदेड जिल्ह्यातील समाजवादी चळवळीत गेल्या 50 वर्षांहून अधिक काळापासून सूर्यकांत वाणी कार्यरत होते. जनता पक्ष, जनता दल (से.) ते समाजवादी पक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास होता. एक निष्ठावंत सामाजिक कार्यकर्ता म्हणून सर्वत्र त्यांचा परिचय होता. गेल्या काही दिवसांपासून सूर्यकांत वाणी यांची प्रकृती बिघडल्याने डॉ.व्यंकटेश काब्दे यांच्या मार्गदर्शनात नारायणा सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल येथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज सकाळी सव्वा सातच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या पार्थिवावर दुपारी 2 च्या सुमारास जुना मोंढा भागातील रामघाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी झालेल्या शोकसभेत सूर्यकांत वाणी यांचे निःस्वार्थ राजकीय आणि सामाजिक कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे अशा शब्दात माजी खा.डॉ.व्यंकटेश काब्दे यांनी त्यांना श्रद्धाजली वाहिली.
यावेळी माजी उपमहापौर आनंद चव्हाण, नांदेड एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष सीए डॉ.प्रविण पाटील, दै.प्रजावाणीचे संपादक शंतनु डोईफोडे, कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष एकनाथ मोरे, भाजपचे प्रविण गायकवाड, माकपचे कॉ.विजय गाभणे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ऍड.कॉ.प्रदीप नागापूरकर, समाजवादी पक्षाचे डॉ.पी.डी. जोशी पाटोदेकर, प्रा.गौतम दुथडे, आरपीआय आठवले गटाचे मिलिंद शिराढोणकर, कॉंग्रेसचे माजी सभापती रंगनाथ भुजबळ, नायगावचे शंकर कल्याण आदींनी सूर्यकांत वाणी यांच्या कार्याचा गौरव करुन शोक व्यक्त केला. या शोकसभेचे सुत्रसंचलन गणेश पाटील यांनी केले. यावेळी दिपनाथ पत्की, प्रा.बालाजी कोम्पलवार, के.के.जांबकर, ऍड.चिरंजीवीलाल दागडीया, प्राचार्य लक्ष्मण शिंदे, आर.एम.जाधव, डॉ.रविंद्र चिद्रावार, उपप्राचार्य अशोक सिद्धेवाड, सचिन पवार, प्रा.राजेश सोनकांबळे, कॉ.उज्ज्वला पडलवार, कॉ.गंगाधर गायकवाड, राज गोडबोले, सूर्यकांत पटणे, महेश शुक्ला, आडे, डॉ.पुष्पा कोकीळ, खान मॅडम, धनंजय डोईफोडे, ऍड.प्रशांत कोकणे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यंवर सहभागी झाले होते.
