Complaint to Chief Minister Eknath Shinde ; आमदाराच्या गावातील कोट्यावधीचा सिमेंट काँक्रेट रस्त्याचे काम बोगस; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे तक्रार
एजन्सीचे नाव काळ्या यादीत टाकून अभियंता, ठेकेदारावर गुन्हे दाखल करा अन्यथा २४ तारखेपासून बांधकाम विभाग भोकर कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार
हिमायतनगर,दत्ता शिराने| हदगाव – हिमायतनगर तालुक्याचे आमदार यांच्या मूळ गावात मंजूर झालेल्या जिल्हा परिषद अंतर्गत कोट्यवधींच्या सिमेंट काँक्रेटच्या रस्त्याचे काम अत्यंत बोगस पद्धतीने करण्यात येत आहे. केवळ शासनाला चुना लावण्याचे काम संबंधित ठेकेदार व जिल्हा परिषदचा अभियंता करत आहे. या कामाची तक्रारदारासमक्ष सविस्तर चौकशी करावी, संबंधीत एजन्सीचे नाव काळ्या यादीत टाकून ठेकेदार व बोगस कामाला संमती देणाऱ्या अभियंत्यावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे जवळगाव येथील जागरूक नागरिक रामराव शेषेराव बंडे यांनी केली आहे.
हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदार संघात जवळपास हजारो कोटींचा निधी निवडणुकीच्या तोंडावर उपलब्द झाला असल्याचे सांगितले जात आहे. आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन हदगाव- हिमायतनगर मतदार संघात विकास कामाचे नारळ फोडण्याचे काम विद्यमान आमदार महोदयांनी केले असल्याचे सर्वश्रुत आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत मंजूर झालेली काही कामे सुरु असून, काही कामे प्रलंबित आहेत. सुरु असलेल्या विविध विकास कामात मोठ्या प्रमाणात हेराफेरी करून शासन व जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे काम संबंधित ठेकेदाराकडून टक्केवारीची भूक लागलेल्या अभियंत्याच्या माध्यमातून केले जात आहे.
सदरील रस्ते व इतर विकास कामे करताना अंदाजपत्रकाच्या बगल देऊन थातुर माथूर पद्धतीने करून निवडणुकीला लागणार खर्च या विकास कामातून काढण्याचा प्रयत्न होतो कि काय..? अशी शंका आता मतदारांना येऊ लागली आहे. मागील पाच वर्षात जेवढी झाली नाही तेवढ्या निधीच्या कामाचे लोकार्पण आणि भूमिपूजन निवडणुकीपूर्वी केल्याने मतदार राजा देखील विचारात पडला आहे. असेच एका सिमेंट काँक्रेटच्या रस्त्याचे बोगस काम नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात येणाऱ्या मौजे जवळगाव येथे सुरु असल्याची तक्रार थेट मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे. सदर रस्त्याचे काम गावातील मुख्य प्रवेशकमान म्हणजेच बसस्थानक पासून ते जिल्हा परिषद शाळेपर्यंत अंदाजे १ किमी अंतराच्या रस्त्याचे काम नांदेडच्या एका ठेकेदारामार्फत सुरु आहे.
या रस्त्याची देखभाल करणारे जिल्हा परिषद नांदेडचे शाखा अभियंता व सहाय्यक अभियंता यांनी सबंधित ठेकेदारशी मिलीभगत करून अंदाजपत्रकाच्या बगल देऊन मनमानी पद्धतीने बोगस काम करण्याचा सपाटा लावला आहे. सदरचे काम करताना जुना रस्ता न खोदता जेसीबीने थातुर माथूर उखरून परत त्याचं कामावर नवीन काम केले जात आहे. याबाबत तक्रारदाराने अभियंता कांबळे याना विचारणा केली असता उडवा उडवीचे उत्तरे दिली जात आहेत. संबंधित कामाचे अंदाजपत्रक माहिती अधिकाराचा अर्ज देऊन मागणी केली असता देण्यास टाळाटाळ करत असल्याचे देण्यात आलेल्या तक्रारीत म्हंटले आहे. सदर कामामध्ये मोठ्या प्रमाणात हेराफेरी करण्याच्या उद्देशामुळे कि काय..? अंदाजपत्र देण्यास अभियंता टाळाटाळ करत असून, या रस्त्याच्या कामाची चौकशी करून संबंधित गुत्तेदार अभियंता यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी. शासन व जनतेची दिशाभूल केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करावे. तोपर्यंत सदर रस्त्याच्या कामाचे देयके देण्यात येऊ नये अशी मागणीही जवळगाव येथील तक्रारदार तथा गावातील जागरूक नागरिक रामराव शेषेराव बंडे यांनी केली आहे.
तक्रारीच्या अनुसार जवळगाव येथील बोगस सिमेंट काँक्रेट रस्त्याच्या कामाची चौकशी होऊन संबंधितांवर गुन्हे दाखल झाले नाही तर जिल्हा परिषद बांधकाम विभाग भोकर येथील कार्यालयासमोर दिनांक २४ पासून बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल. असा इशाराही तक्रारकर्त्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना दिनांक १८ रोजी पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे. या निवेदनाच्या प्रति त्यांनी जिल्हाधिकारी नांदेड, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड, पोलीस अधीक्षक, नांदेड, कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद नांदेड, उपकार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम विभाग भोकर, पोलीस निरीक्षक आणि संपादक, पत्रकार याना प्रसिद्धीसाठी छायाचित्र व व्हिडीओसह पाठविले आहे.
तक्रादाराने सांगितले कि, सिमेंट काँक्रेट रोड झाल्यानंतर म्हणावी तशी क्युरिंग केली गेली नसून, रस्त्यावरील पाण्याचा निचरा होण्यासाठी करण्यात येणारी ग्रू-कटिंग देखील केली नाही. तसेच साईडपट्या देखील भरल्या नसल्याने येणारे जाणारे वाहन बुचकळ्यात पडत आहेत. यामुळे एखादा अपघात होण्याची शक्यता देखील नाकारत येत नाही असे तक्रारकर्त्याने म्हणणे आहे. याबाबत संबंधित अभियंता यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.