हिमायतनगर येथील नागरिकांच्या ज्वलंत मागण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन ; १६ रोजी परमेश्वर मंदिरा समोर थाळी नाद आंदोलन
हिमायतनगर। लोकविकास संघर्ष समिती व सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनच्या वतीने हिमायतनगर येथील नागरिकांच्या जीवन मरणाच्या मागण्या घेऊन मागील दोन वर्षांपासून संघर्षशील लढा सुरु आहे.
तहसीलदार, विद्यमान आमदार व मुख्याधिकारी यांनी दिलेल्या आश्वासनामुळे अनेक दिवसापासून सुरु असलेले आंदोलन कॉ. दिगंबर काळे यांनी तात्पुरते स्थगित केले होते. दि.१ ऑक्टोबर रोजी हदगाव हिमायतनगर चे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नगर परिषद येथे बैठक झाली परंतु समाधान झाले नाही.त्यामुळे १६ ऑक्टोबर पासून बेमुद्दत थाळी नाद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हिमायतनगर येथे मागील ५० ते ६० वर्षांपासून नागरिकांची घरे असून त्यांचे वास्तव्य तेथे आहे. विद्युत लाईट,नाली,रस्ते तेथे शासनाच्या वतीने सुविधा पुरविण्यात आल्या आहेत परंतु ती घरे अजून घरमालकांच्या नावावर करण्यात आले नाहीत. वस्तीवाढ योजने अंतर्गत सर्वे करून घरकुल मंजूर करावेत.ती घरे तात्काळ नावावर करावीत.
मनरेगा अंतर्गत कामे उपलब्ध करून द्यावीत.निराधार, दिव्यांग,वयोवृद्ध, विधवा, परितकत्या व भूमिहीन आदींना अनुदान व पेन्शन वाटप करावे.एपीएल पात्र लाभार्थी व शेतकऱ्यांना पूर्वी प्रमाणे रेशन देण्यात यावे.मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा गवगवा करणाऱ्या सरकारने मराठी शाळा बंद करण्याचे षडयंत्र बंद करून शाळा कुणालाही चालवण्यासाठी देऊ नये.एमआयडीसी निर्माण करून बेरोजगार तरुणांना काम उपलब्ध करून द्यावे.
आदी मागण्या जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे करण्यात आल्या आहेत. तसे निवेदन निवासी उप जिल्हाधिकारी महेश वडदकर यांना देण्यात आले असून निवेदन देतांना शिष्टमंडळात कॉ.उज्वला पडलवार, कॉ.गंगाधर गायकवाड, कॉ.दिगंबर काळे,गणेश रचेवार,नवीन कुमार मादसवार,गंगाधर गायके आदीजन उपस्थित होते. अशी माहिती सीटू कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉ. गंगाधर गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.