लांजी वाळु डेपो चालकांकडून घरकुल लाभार्थ्यांचे आर्थीक शोषण – दादाराव गायकवाड
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। गोर गरीब घरकुल लाभार्थ्यांच्या घरकुलाकरिता कोणतेही स्वामित्वधन न आकारता ५ ब्रास वाळू देण्यास २०२३ च्या शासन निर्णयानुसार परवानगी देण्याची तरतूद करण्यात आली आहे. या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांच्या घरकुलांकरिता अनेक ठिकाणी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी परवानगी दिली आहे. त्यात माहूर तालुक्यातील लांजी येथे रेतीघाट निश्चित करण्यात आले असून घरकुल लाभार्थ्यांना रेतीचे वाटप हि चालु आहे. परंतु घरकुल लाभार्थ्याकडुन नियमबाह्य वसुली केल्या जात असून होत असलेली बेकायदेशीर आर्थीक लुट थांबविण्यासाठी वंचीतचे नांदेड जिल्हा कमेटी सदस्य दादाराव गायकवाड यांनी दि.१८ जून रोजी तहसीलदार माहूर यांच्या मार्फत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना लेखी निवेदन देवून संबंधीतांना तात्काळ कायदेशीर निर्देश देणे बाबत मागणी केली आहे.
गायकवाड यांनी दिलेल्या निवेदनात लांजी येथील वाळु डेपो धारकाकडून घरकुल लाभार्थ्याकडुन नियमबाह्य वसुली केल्या जात आहे, तसेच गाडीभाडे अधिकचे घेतल्या जात असुन रेती डेपोवर इतर व्यक्ती नियमबाह्य वसुली करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.त्याच बरोबर घरकुल लाभार्थ्यांना रोडा मिश्रीत निकृष्ठ रेती वाटप करीत असुन लाभार्थ्यांनी चांगल्या रेतीचा मागणी केली असता अधिकच्या पैशाची मागणी केल्या जात असल्याचे नमूद आहे.
घरकुल लाभार्थी हा ऑनलाईन नोंदणी करुन रेती डेपोवर पावती घेऊन जावून त्रस्त आहे. सर्व रेती डेपोवर शासनाने अटी व नियमाचा किव्हा किती कि.मी. प्रमाणे भाडे आकारणी व महसुल बाबतचा जो काही मावेजा द्यावयाचा आहे. या बाबत दर्शनी दरपत्रक लावण्यात यावे.व घरकुल लाभार्थ्यांना रेतीच्या संदर्भात येणाऱ्या सर्व अडचणी तात्काळ दुर करुन होत असलेली बेकायदेशीर आर्थीक लुट थांबविण्यासाठी आपल्या स्तरावरुन तात्काळ सर्व संबंधीतांना निर्देश देण्यात यावे,अशी मागणी केली आहे.सदरील दिलेल्या निवेदनावर दादाराव गाकयकवाड यांची साक्षरी आहे.
गोर गरीबांना निकृष्ठ दर्जाची पुरविण्यात आलेली वाळु व अवैध मार्गाणे वाळुची विदर्भात केलेली तस्करी या प्रकरणी लवकरच जिल्हाधिकारी साहेब यांना रीतसर तक्रार व पुरावे सादर करणार असून जिल्हाधिकार्यांनी संबंधीत वाळु डेपो चालकावर कार्यवाही न केल्यास लवकरच माहूर तहसील कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याची प्रतिक्रीया गायकवाड यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली आहे.