नवीन नांदेड। एसजीजीएस अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था विष्णुपूरी नांदेड येथील वस्त्र तंत्रशास्त्र विभागातर्फे नांदेड व आजूबाजूच्या परिसरातील युवक व युवतींसाठी “टेक्स्टाईल व गारमेंट उत्पादन” या विषयावर तीन आठवड्यांची कौशल्य विकास कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे,ही कार्यशाळा दिनांक ५ ते २४ जून च्या दरम्यान होत आहे.
यात शासकीय आयटीआय नांदेड, जीवन साधना टेलरिंग इन्स्टिट्यूट नांदेड व इतर ३५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे.या कार्यशाळेतून ड्रेस डिझाईनिंग व गारमेंट या क्षेत्रात कौशल्य संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना धागा, कापड व गारमेंट कसा बनतो,याबद्दलचे वर्ग व प्रात्यक्षिकांद्वारे माहिती देण्यात येते त्यामुळे विद्यार्थ्यांना खूप मोठा फायदा होतो. अशी कार्यशाळा २००३ पासून दरवर्षी एसजीजीएस अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था नांदेड च्या वस्त्रतंत्र शास्त्र विभागातर्फे आयोजित केली जाते.
या कार्यशाळेचे उद्घाटन संस्थेचे संचालक डॉ.मनेश ब. कोकरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.कार्यशाळेचे संयोजक व वस्त्रतंत्र शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.रवींद्र जोशी यांनी प्रास्ताविक मांडले आणि संयोजक डॉ. प्रकाश खुडे यांनी सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन केले.
उद्घाटन प्रसंगी डॉ.मनेश ब. कोकरे म्हणाले. “महाराष्ट्रातील एक अग्रगण्य तंत्र शिक्षण संस्था या नात्याने आमच्या संस्थेत दहा विभागात जी साधनसामुग्री उपलब्ध आहे ती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावी असा आमचा नेहमीच उद्देश असतो आणि अनेक विभागातर्फे अशा कार्यशाळा आयोजित केल्या जातात.”
डॉ.रवींद्र जोशी यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले, “टेक्स्टाईल व गारमेंट या क्षेत्राकडे सरकार रोजगार, उद्योग, कौशल्य विकास आणि स्टार्ट अप्ससाठी खूप गांभीर्याने पाहते आणि त्यांच्या अनेक योजना आहेत व तरुणांसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. अशा प्रकारच्या कार्यशाळा मागील वीस वर्षांपासून आयोजित केल्या जातात. यात विद्यार्थ्यांना टेक्स्टाईल व गारमेंट क्षेत्रात उद्योजक बनण्यासाठी व रोजगार मिळवण्यासाठी एक व्यापक दूरदृष्टी मिळते.”
उद्घाटन प्रसंगी जीवन साधना टेलरिंग इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ.संगनवार व शासकीय आयटीआय येथील ड्रेस डिझायनिंग विभागाचे प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यशाळेचा संदेश सर्व संस्था पर्यंत पोहोचवण्याचे व विद्यार्थ्यांची नोंदणी करून घेण्याचे काम सुधीर आंबेकर यांनी केले आहे.